पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढतच चालले आहेत. आज मुंबईत पेट्रोल २८ पैशांनी तर डिझेल २४ पैशांनी महागले. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ८८ रुपये ६७ पैसे इतका आहे. तर डिझेलचा प्रति लिटर दर ७७ रुपये ८२ पैसे इतका झाला आहे. दिल्लीत पेट्रोल ८१ रुपये २८ पैसे प्रति लिटर आहे. तर डिझेलचा दर ७३ रुपये ३० पैसे प्रति लिटर झाला आहे.

बुधवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले नव्हते. त्यानंतर गुरुवारी पेट्रोल १३ पैशांनी तर डिझेल ११ पैशांनी महागले. आता आज पुन्हा एकदा पेट्रोल २८ पैशांनी तर डिझेल २४ पैशांनी महागले आहे. सलग १७ दिवस वाढ झाल्यावर फक्त बुधवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले नव्हते. इंधन दरवाढीचा निषेध करत काँग्रेससह सगळ्याच विरोधकांनी भारत बंद पुकारला होता. तसेच पेट्रोल आणि डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत आणावेत अशीही मागणी केली होती. तर पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला महागाईच्या अंधारात ढकलले आहे अशी टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.