गेल्या काही महिन्यांपासून सतत वाढतच जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सामान्य माणूस अक्षरशः वैतागला आहे. मात्र, अशातच काहीशी दिलासादायक बातमी मिळत आहे. आज पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये काहीशी घट झाली आहे. गेल्या काही दिवसांत सतत होणाऱ्या दरवाढीच्या तुलनेत आज झालेली घट सकारात्मक आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, राजधानी दिल्लीत पेट्रोलचे भाव १५ पैश्यांनी कमी झालं असून आता १०१.१९ रुपये प्रतिलीटर दराने तिथे पेट्रोल मिळत आहे. तर डिझेलच्या किमतीतही १५ पैश्याची घट झाली असून डिझेलचा दर आता ८८.६२ टक्के झाला आहे. मुंबईतच्या पेट्रोलच्या दरात १३ पैश्यांची घट झाली असून सध्याचा दर १०७.२६ रुपये प्रतिलीटर आहे. तर डिझेल ९६.१९ रुपये प्रतिलीटर आहे.

आंतरराष्ट्रीय तेल कंपन्यांचे दर जरी स्थिर असले तरी भारतातल्या सरकारी तेल कंपन्यांनी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला तेलाच्या किमतीत काहीशी घट केली आहे.

दरम्यान, पारंपरिक इंधनात झालेली दरवाढ व महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले धोरण पाहता आता विद्युत वाहनांकडे खरेदीदारांचा कल वाढत आहे. जानेवारी ते जुलै या कालावधीत २७८ वाहनांची नोंद नवी मुंबई उपप्रादेशिक कार्यालयात झाली आहे. यात १५० बस असून ५८ कार व  ७० दुचाकींचा समावेश आहे.

ऑगस्ट महिन्यात यात आणखी वाढ झाली असून ही संख्या तीनशेपेक्षा अधिक झाली आहे. आगामी काळात यात वाढ होईल असे वाहन विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

पारंपरिक इंधनाचा तुटवडा व प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने विद्युत वाहनांबाबत धोरण जाहीर केले असून त्याला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर नुकतेच महाराष्ट्र शासनानेही आपले विद्युत वाहनांबाबत धोरण जाहीर केले आहे. यात अनेक सबसिडीच्या माध्यमातून अनेक सवलती देण्यात येत असून पायाभूत सुविधांवरही भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर विद्युत (बॅटरीवर चालणारी) वाहने खरेदीचा विचार करीत असून कल वाढत असल्याचे चित्र आहे.