पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. रविवारी(दि.13) सलग चौथ्या दिवशी दरवाढ करत तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत प्रतिलिटर 49 पैसे तर डिझेल 59 पैशांची वाढ झाली. तर मुंबईत पेट्रोल 48 पैसे आणि डिझेल 59 पैशांनी महाग झालं. प्रतिलिटर 48 पैशांची वाढ झाल्याने मुंबईत आता एक लिटर पेट्रोलसाठी 75.39 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेलसाठी प्रतिलिटर 66.66 रुपये मोजावे लागतील.

दुसरीकडे दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल 69.75 रुपये प्रतिलिटर झालंय. पेट्रोल आणि डिझेलमध्ये नव्या वर्षात झालेल्या या मोठ्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली. पण आठवड्याच्या शेवटी ही दरवाढ थांबली असतानाही भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवरील त्याचा परिणाम कमी झालेला नाही. दरम्यान, लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.