पेट्रोल-डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा सलग पाचव्या दिवशी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात आंतरराष्ट्रीय स्तरावर २ टक्क्यांनी वाढ झाल्याने तेलाच्या प्रतिबॅरलची किंमत ७० डॉलरपर्यंत पोहोचली आहे. त्याचा परिणाम म्हणून देशातील पेट्रोलिअम कंपन्यांनी आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १५ पैशांनी तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर १७ पैसे इतकी वाढ केली आहे. नव्या वर्षात १ जानेवारीपासून आजपर्यंत पेट्रोलच्या किंमतीत ५५ पैशांनी तर डिझेलच्या दरात ७२ पैशांनी वाढ झाली आहे.

पेट्रोलच्या किंमतीत गेल्या वर्षी २६ डिसेंबरपासून सातत्याने वाढ होत असून डिझेलच्या किंमतीत २९ नोव्हेंबरपासून वाढ होत आहे. त्यामुळे या दोन्ही इंधनांच्या दरवाढीत मोठा फरक पडला असून अद्यापपर्यंत डिझेलच्या किंमतीत २.७८ रुपये प्रतिलिटरने तर पेट्रोलच्या किंमतीत ९१ पैशांनी वाढ झाली आहे.

नवी दिल्लीतील आजचा पेट्रोलचा दर ७५.६९ रुपये इतका आहे. तर, डिझेलचा दर ६८.६८ रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा आजचा दर ८१.५८ रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर ७२.०२ रुपये प्रतिलिटर इतका आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही इंधन दरवाढीवर परिणाम

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी ठार झाल्यानंतर त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराकवर निर्बंध लादण्याची धमकी दिल्यामुळे त्याचा परिणामही इंधनांच्या किंमतींवर पहायला मिळत आहे. यामुळे भारताच्या तेल पुरवठ्यावर तत्काळ कुठलाही परिणाम होणार नसला तरी किंमतीचा फटका मात्र बसला आहे. भारत ८४ टक्के इंधन मध्य आशियातील देशांमधून आयात करतो. यांमध्ये इराक आणि सौदी अरेबिया हे दोन देश टॉप निर्यातदार आहेत.