वाढत्या इंधन दरामुळे होरपळलेल्या पश्चिम बंगालच्या जनतेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी थोडासा दिलासा दिला आहे. ममता बॅनर्जींनी मंगळवारी पेट्रोल, डिझेलच्या दरात १-१ रूपयांनी कपात केली आहे. ममता सरकारपूर्वी आंध्र प्रदेश आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचलेले होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात २-२ रूपयांची कपात केली होती.

राजस्थानमधील वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सरकारनेही इंधन दर कमी केले. इथे सरकारने पेट्रोल-डिझेलवर लावण्यात आलेल्या व्हॅटमध्ये चार टक्क्यांची कपात केली होती. विशेष म्हणजे येत्या काही महिन्यात राजस्थानमध्ये निवडणुका होणार आहेत.

दरम्यान, मंगळवारी मुंबईत पेट्रोलच्या दरात १४ पैशांची वाढ झाली. पेट्रोलचे दर ८८.२६ रूपये प्रति लिटर इतके झाले. तर दुसरीकडे डिझेलच्या दरात १५ पैशांची वाढ नोंदवण्यात आली. डिझेलचे दर हे ७७.४७ रूपये प्रति लिटर इतके झाले.

इंधन दरात सातत्याने वाढ होत असल्याच्या विरोधात सोमवारी काँग्रेससह देशातील विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारला होता. देशातील विविध राज्यांत मोर्चा, रास्ता रोको, तोडफोडीचे काही प्रकार घडले होते.