तेल कंपन्यांनी वाढवलेल्या किमतीमुळे देशात सलग ७व्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये विक्रमी वाढ झाली. नवीन किमतीनुसार आज दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८९ रूपये होता, म्हणजे कालपेक्षा त्यात २६ पैश्यांची वाढ झाली. मुंबईमध्ये साध्या पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ९५ रूपयांपेक्षा जास्त होती. तर परभणी येथे प्रीमियम (पदार्थमिश्रित) पेट्रोलच्या किमतीने शंभरी ओलांडली.
करोना महामारीच्या संकटामुळे आधीच त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आणखी अडचणींचा सामना करावा लागणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत. राजस्थानची राजधान जयपूर येथे पेट्रोलचा दर ९५ रूपये ५१ पैसे होता तर श्रीगंगानगर येथे प्रतिलिटर दराने शंभरचा टप्पा गाठला. कोलकत्त्यामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत ९०.२५ रुपये होती तर बंगळुरु (९१.९७ रुपये), हैदराबाद (९२.५३ रुपये), पटना (९१.६७ रुपये) आणि तिरुवनंतपुरम (९०.८७ रुपये) असे दर आहेत.
जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या दराने प्रति बॅरल 60 डॉलरचा टप्पा पार केल्यामुळे जगभरात इंधनाच्या दरात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे कर आकारणीच्या उच्च दरामुळे इंधनाचे दर आधीच जास्त आहेत अशा भारतासारख्या देशांमध्ये तीव्र परिणाम होऊ शकतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही वरील करांचे सर्वाधिक दर भारतामध्ये आहेत. कोविड-१९ च्या संकटानंतर आपली महसूल स्थिती मजबूत करण्याच्या दृष्टीने सरकार उत्पादन शुल्क कमी करेल याची शक्यता कमीच आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2021 12:01 pm