अखेरच्या टप्प्याच्या मतदानानंतर सोमवारी इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात 5 पैशांची तर डिझेलच्या दरात 9 पैशांची वाढ झाली आहे.

सोमवारी इंधन कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 9 पैशांची तर डिझेलच्या दरात 16 पैशांची वाढ झाली होती. त्यानंतर मुंबईत पेट्रोलचा दर 76.73 रूपये प्रति लिटर आणि डिझेल 69.27 रूपये प्रति लिटर पोहोचला होता. त्यानंतर पुन्हा एकदा दरवाढ झाल्यामुळे आता मुंबईत पेट्रोलचा दर 76.78 रूपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 69.36 रूपये प्रति लिटर इतका झाला आहे. तर पुण्यात पेट्रोल 76.66 रूपये प्रति लिटर आणि डिझेल 68.15 रूपये प्रति लिटर इतके झाले असून औरंगाबादमध्येही पेट्रोलचे दर 77.87 रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 70.46 रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. दिल्लीतही पेट्रोलचे दर 71.17 रूपये आणि डिझेलचे दर 66.20 रूपये प्रति लिटर झाले आहेत.

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असल्याने इंधनाच्या दरांमुळे सरकारवर मतदारांचा रोष निर्माण होऊ नये, याची काळजी घेत केंद्र सरकारने सरकारी इंधन कंपन्यांना पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यास सांगितले होते. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये विशेष फरक पडला नव्हता. उलट सातत्याने इंधनांच्या दरांमध्ये घट होत होती. मात्र, अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर लगेचच झालेली ही दरवाढ नियमित स्वरुपाचीच दरवाढ असल्याचे इंधन कंपन्यांनी म्हटले आहे.

सरकारी इंधन कंपन्यांवरील दर निश्चितीचे नियंत्रण केंद्र सरकारने हटवल्याने आता जागतिक बाजारातील इंधनांच्या किंमतींनुसार, देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दररोज बदल होत आहेत. सध्या जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचा दर हा ७२.९८ डॉलर प्रति बॅरल इतका आहे.