दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दोन दिवस किमती स्थिर होत्या. एकीकडे संपुर्ण देश करोना संकटाचा सामना करत आहे. मात्र यामध्ये सामान्यांना महागाईचा देखील फटका बसत आहे. मुंबईत तर पेट्रोल शंभरीजवळ गेले आहे. आज (शुक्रवार) पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १७ ते १९ पैसे आणि डिझेलच्या दरात ३० पैशांची वाढ झाली आहे. यासह मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ९९.३२ रुपये इतके झाले आहेत. मागील १८ दिवस निवडणुकांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झाला नव्हता. निवडणूक संपताच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भडकल्या.

इंधनाच्या किमतीत होत असलेल्या वाढीमुळे देशातील बर्‍याच राज्यात पेट्रोल १०० च्या वर गेले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बर्‍याच शहरांमध्ये यापूर्वीच किमतींनी १०० रुपयांची मर्यादा ओलांडली होती आणि आजच्या वाढीसह मुंबईतील किंमतही १०० रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे.

काय आहेत आजचे दर

आजच्या वाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९३.३४ रुपये केले आहेत. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर ८३.८० रुपये झाला आहे. मुंबईत तर पेट्रोल ९९.३४ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ९१.०१ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ९४.७१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८८.६२ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत ९३.११ आणि डिझेलची किंमत ८६.६४ रुपये प्रतिलिटर झाली आहे.

भोपाळमध्ये पेट्रोल प्रतिलिटर १०१.११ रुपये तर डिझेल ९२.२१ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. लखनौमध्ये पेट्रोल ९०.७२ आणि डिझेल ८४.१८ प्रती लिटर विकत आहे.

चेक करा तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर

देशात तेलाच्या दरात दररोज सकाळी ६ वाजता सुधारित केले जातात. कारण देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवीन दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजेपासून लागू होतात.

आपल्या फोनवरून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे आपण जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइल एसएमएस सेवेअंतर्गत आपण ९२२४९९२२४९ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता. आपला एसएमएस असा असेल, RSP <स्पेस> पेट्रोल पंप डीलर कोड.