कर्नाटकमधील निवडणुकीनंतर सुरु असलेली इंधन दरवाढ मंगळवारीही कायम आहे. मंगळवारी मुंबईत पेट्रोलच्या किमतीने उच्चांक गाठला असून पेट्रोलने लिटरमागे ८४. ७३ रुपयांचा आकडा गाठला. तर डिझलेने लिटरमागे ७२. ५३ रुपयांचा आकडा गाठला आहे. पेट्रोल व डिझेल महागल्याने महागाई देखील वाढणार आहे. तर दुसरीकडे पेट्रोल- डिझेल दरवाढीवरुन विरोधकही आक्रमक झाले असून सोशल मीडियावरही मोदी सरकारवर टीका सुरु आहे. कर्नाटकच्या निवडणुकीमुळे केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारने काही काळ रोखून धरलेली इंधन दरवाढ निकालानंतर लागू केल्यामुळे देशभरात पेट्रोल- डिझेलच्या दराने उच्चांक गाठला. इंधन दरवाढीमुळे वस्तू आणि शेतमालाची भाववाढ अटळ आहे. काय महागणार? पेट्रोल आणि डिझेलच्या दर वाढीमुळे माल वाहतुकीच्या दरात १० ते २५ टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांकडून भाज्यांच्या दरामध्ये वाढ केली जाणार आहे. म्हणजेच पेट्रोल- डिझेल दरवाढीचा थेट फटका स्वयंपाकघराला बसणार आहे. पेट्रोल दरवाढीचा आलेख (पेट्रोलचे दर प्रतिलिटरमागे) > १३ मे रोजी ८२.४८ रुपये दर होते. > १४ मे रोजी या दरात १७ पैशांची वाढ झाली > १५ मे रोजी १४ पैसे, १६ मे रोजी १५ पैसे, १७ मे रोजी २२ पैसे, १८ मे रोजी २९ पैसे, १९ मे रोजी ३० पैसे तर २० मे रोजी तब्बल ३२ पैशांची वाढ झाली. तर मंगळवारी २९ पैशांनी वाढ झाली आहे. म्हणजेच गेल्या नऊ दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात दोन रुपयांची वाढ झाली आहे.