देशात पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा एकदा भडकले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची भावावाढ कायम राहिल्याने त्याचा परिणाम भारतातील इंधनाच्या दरावर दिसून येत आहे. सोमवारी पेट्रोल-डिझेल वितरण कंपन्यांकडून इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली. या नव्या वाढीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर दोन वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचले असून, मुंबईत पेट्रोल ९० रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.

देशभरात सोमवारी पेट्रोलच्या दरात २९-३० पैशांची वाढ झाली. नव्या दरवाढीमुळे पेट्रोलचे दर दोन वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. मुंबई व जयपूरमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर ९० रुपये इतका झाला. तर दिल्लीतही ८३.७१ रुपये झाले आहेत. कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद व पाटणासह देशातील इतरही शहरात पेट्रोलचे दर प्रति लिटर ८५ रुपयांवर गेले आहेत.

डिझेलच्या किंमतीतही सलग दुसऱ्या वाढ झाली आहे. सोमवारी डिझेलच्या दरात २६ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई, जयपूर, हैदराबाद व भुवनेश्वरसह इतर शहरांमध्ये डिझेलचे दर प्रति लिटर ८० रुपयांवर पोहोचले आहेत. तर राजधानी दिल्लीत डिझेलचे दर ७३.८७ रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत. यापूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर सप्टेंबर २०१८ मध्ये इतक्या उच्चांकी पातळीवर गेले होते.

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्यानं इंधन दरवाढीचं संकट ओढवलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली इंधन दरवाढ आधीच महागाई वाढलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली नसल्याचं अर्थ विश्लेषकांकडून सांगितलं जात आहे.