पेट्रोल आणि डिझेलच्या दराने रविवारी देशभरात उच्चांक गाठला. दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ७३ रुपये ७३ पैशांवर पोहोचले. तर डिझेलचे दर ६४ रुपये ५८ पैशांवर पोहोचले आहेत. मुंबईतही पेट्रोलच्या दराने ८१ रुपयांचा तर डिझेलच्या दराने ६८ रुपयांचा पल्ला ओलांडला आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्या दररोज पेट्रोल व डिझेलच्या दरांचा आढावा घेतात. रविवारी पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत पेट्रोल व डिझेलच्या दरात १८ पैशांनी वाढ करण्यात आली.

दिल्लीत पेट्रोलचे दर लिटरमागे ७३.७३ रुपयांवर पोहोचले आहे. १४ सप्टेंबर २०१४ नंतर पेट्रोलच्या दराने गाठलेला हा उच्चांक आहे. १४ सप्टेंबर २०१४ रोजी पेट्रोलच्या दराने ७६ रुपये ०६ पैशांचा पल्ला गाठला होता. तर फेब्रुवारी २०१८ नंतर डिझेलच्या दराने गाठलेला हा नवा पल्ला आहे. ७ फेब्रुवारी २०१८ रोजी दिल्लीत डिझेलचे दर लिटरमागे ६४ रुपये २२ पैसे इतके होते. आता हे दर हेच दर ६४ रुपये ५८ पैशांवर पोहोचले आहे.

मुंबईतही पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येते. मुंबईत रविवारी पेट्रोलचे दर लिटरमागे ८१ रुपये ५९ पैसे इतके असून डिझेलचे दर ६८ रुपये ७७ पैशांवर पोहोचले आहे.

गेल्या वर्षभरात मुंबईत पेट्रोलच्या दरात लिटरमागे ९ रुपये तर डिझेलच्या दरात ७ रुपयांनी वाढ झाली आहे.  १ एप्रिल २०१७ रोजी मुंबईत पेट्रोलचे दर लिटरमागे ७२ रुपये ६६ पैसे तर डिझेलचे दर ६१ रुपये २७ पैसे इतके होते. या दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे.

रोजच्या रोज दरवाढ करण्याऐवजी तीन महिन्यांनी दरांमध्ये फरक करावा, पेट्रोल आणि डिझेलाही वस्तू सेवा कराच्या कार्यकक्षेत घ्यावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्पातून याबाबत कोणताही दिलासा दिला नव्हता. पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने सरकारची विरोधकांकडून कोंडी होण्याची शक्यता आहे.