पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

इथेनॉलच्या वापरावर भारत लक्ष केंद्रित करीत असून त्याचा लाभ देशातील शेतकऱ्यांना होणार आहे, त्यामुळे २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य भारताने ठेवले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे सांगितले.

ऊस त्याचप्रमाणे गहू, तांदूळ आणि अन्य कृषीकचऱ्यापासून निर्माण केलेल्या इथेनॉलपासून कमी प्रदूषण होते आणि त्याच्या वापराने शेतकऱ्यांना उत्पन्नाचा पर्याय मिळतो, असेही मोदी म्हणाले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इथेनॉल वापराच्या आराखड्याबाबत ते बोलत होते. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य पूर्वी २०३० होते, ते आता २०२५ पर्यंत ठरविण्यात आले आहे, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी सरकारने २०२२ पर्यंत पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य ठरविले होते, तर २०३० पर्यंत हे लक्ष्य २० टक्के असे होते. सध्या पेट्रोलमध्ये ८.५ टक्के इथेनॉल मिसळण्यात येते.  २०१४ मध्ये १-१.५ टक्के इथेनॉल मिसळले जात होते. इथेनॉल जास्त वापरल्याने त्याची खरेदी ३८ कोटी लिटरवरून ३२० कोटी लिटरवर गेली आहे, जेव्हा २० टक्के इथेनॉल मिसळले जाईल तेव्हा खरेदीत आणखी वाढ होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.