यावर्षीच्या जुलै महिन्यापासून आत्तापर्यंत दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लीटर ७ रूपये इतके वाढले आहेत. मागील तीन वर्षात दिल्लीत झालेली ही सगळ्यात मोठी दरवाढ आहे. दिल्लीत जुलै महिन्याच्या सुरूवातीला डिझेल प्रति लीटर ३ रूपये ६७ पैशांनी महाग झाले. दिल्लीमध्ये डिझेलचा दर सध्याच्या घडीला ५७ रूपये लीटर आहे. मागील चार महिन्यात डिझेलच्या प्रति लीटर किंमतीतही हा उच्चांक आहे.

१६ जून रोजी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लीटर ६५ रूपये ४८ पैसे होते. त्यानंतर २ जुलै रोजी पेट्रोलच्या किंमती २ रूपयांनी कमी होऊन ते दिल्लीत ६३ रूपये ६ पैसे प्रति लीटर मिळू लागले. मात्र त्यानंतर चारच दिवसांनी म्हणजेच ६ जुलै ते आजपर्यंत पेट्रोलचे दर प्रति लीटर ७ रूपयांनी वाढले आहेत. सध्या दिल्लीत पेट्रोलचे दर ७० रूपये प्रति लीटर आहेत. त्याचप्रमाणे डिझेलचे दर १६ जून रोजी प्रति लीटर ५४ रूपये ५० पैसे प्रति लीटर होते. ते सध्याच्या घडीला ५७ रूपये लीटर झाले आहेत. दिल्लीत ही मागील चार महिन्यातली सर्वात मोठी दरवाढ आहे.

२०१४ ते २०१७ या तीन वर्षांच्या काळात दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लीटर ७ रूपयांनी वाढले आहेत. जून महिन्यापासून प्रत्येक दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या काही पैशांनी रोज वाढत आहेत त्याचा फटका आता वाहनधारकांना बसू लागला आहे. सध्याच्या घडीला दिल्लीत दिल्लीत पेट्रोलचे दर ७० रूपये ३३ पैसे आहेत. दिल्लीप्रमाणेच देशात इतर शहारांमध्येही पेट्रोलचे दर रोज बदलत आहेत. त्याचा फटका अर्थात ग्राहकांना बसतो आहे.

कुठल्या शहरात कसे बदलले पेट्रोलचे दर

शहर                जूनमधील पेट्रोल दर               सध्याचे पेट्रोल दर

मुंबई                 ७५ रूपये प्रति ली.                    ७८ रूपये प्रति ली.

पुणे                   ७५ रूपये ५० पै. प्रति ली.          ७७ रूपये ६० पैसे प्रति ली.

औरंगाबाद        ७६ रूपये प्रति ली.                   ७८ रूपये ८६ पैसे प्रति ली.

नागपूर              ७५ रूपये ८९ पैसे प्रति ली.       ७८ रूपये प्रति ली.

कोलकाता        ६८ रूपये प्रति ली.                    ७१ रूपये ६४ पैसे प्रति ली.

हैदराबाद          ६७ रूपये प्रति ली.                   ७२ रूपये ९३ पैसे प्रति ली.

देशातील दोन प्रमुख शहरांच्या आणि महाराष्ट्रातील चार प्रमुख शहरांच्या पेट्रोलच्या प्रति लीटर किंमतींवर नजर टाकली तरीही लक्षात येते की सध्याच्या घडीला जे दर या शहरांमध्ये आहेत त्यांची वाढ लीटरमागे साधारण ३ ते ४ रूपयांपर्यंत झालेली आहे. मात्र दिल्लीत ही वाढ जून ते ऑगस्ट या काळात लीटर मागे ७ रूपये इतकी प्रचंड आहे.