इंधनावरील स्थानिक संस्था कर (एलबीटी) कमी झाल्याने ठाणे-नवी मुंबईतील पेट्रोलच्या दरांत लिटरमागे दीड रुपयाने कपात झाली असतानाच रविवारी मध्यरात्रीपासून देशभरातील पेट्रोलच्या दरांत १ रुपया ५५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाच्या घसरत्या मूल्यामुळे तेलाची आयात महाग झाल्यापासून गेल्या दीड महिन्यातील ही चौथी पेट्रोल दरवाढ आहे.
जून महिन्याच्या एक तारखेला तेल कंपन्यांनी पेट्रोलचे दर लिटरमागे ७५ पैशांनी वाढवले होते. त्यानंतर १६ व २९ जून रोजी पेट्रोलचे दर अनुक्रमे २ आणि १.८२ रुपयांनी वाढवण्यात आले होते. त्यातच रविवारी मध्यरात्रीपासून १ रुपया ५५ पैशांची भर पडली आहे.
ही दरवाढ स्थानिक करांव्यतिरिक्त असल्याने ठिकठिकाणच्या दरांत प्रत्यक्षात या दरवाढीपेक्षा जास्त वाढ होणार आहे.
डिझेलच्या किमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.