पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तेल कंपन्यांनी वाढ केली आहे. पेट्रोल प्रतीलिटर १.३९ रुपये तर डिझेल १.०४ रुपयांनी महाग झाले आहे. नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यापूर्वी १ एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली होती. पेट्रोल प्रतिलिटर ३.७७ रुपये तर डिझेल प्रतिलिटर २.९१ रुपयांनी स्वस्त झाले होते. परंतु, ग्राहकांचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. १५ दिवसांनी कंपन्यांनी पुन्हा दरात वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते.

एका महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती सुमारे १३ टक्क्यांनी कमी झाले आहे. २३ फेब्रुवारी रोजी कच्च्या तेलाचे एक पिंप ५५ डॉलरला होते. ते २३ मार्च रोजी ४८ डॉलरपर्यंत घसरले होते. तसेच गेल्या १५ दिवसांपासून रूपयाही डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला होता. त्यातच कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम देशातील ५ शहरांमध्ये हा प्रयोग राबवला जाणार आहे. त्याच्या यशस्वीतेनंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
या पाच शहरांमध्ये पाँडेचरी, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), उदयपूर (राजस्थान), जमशेदपूर (झारखंड) आणि चंदीगढ यांचा समावेश आहे.