कर्नाटक निवडणुका संपल्यानंतर आज सलग आठव्या दिवशी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. सोमवारी पेट्रोलच्या किंमतीत ३३ ते ३४ पैशांनी तर डिझेलच्या किंमती २५ ते २७ पैशांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून सतत होणाऱ्या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी नवा उच्चांक गाठला आहे. मागील काही आठवड्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीही सतत वाढत आहेत.

सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत मिळत आहे. रविवारी ८४.०७ रुपये प्रतिलिटर मिळणारं पेट्रोल आज सकाळी 6 वाजेपासून ८४.४० रुपये झालं आहे. तर मुंबईत डिझेलच्या किंमती ७२.२१ रुपये प्रतिलिटर आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतिलिटर ७६.५७ रुपयांवर पोहोचलं आहे. तर येथे डिझेलच्या किंमतीनी उच्चांक गाठला असून प्रतिलिटर ६७.८२ रुपयांवर पोहोचलं आहे. यापूर्वी १४ सप्टेंबर २०१३ रोजी दिल्लीमध्ये पेट्रोल ७६ रुपयांवर पोहोचलं होतं. डिझेलच्या किंमती दिल्लीमध्ये आधीपासूनच उच्चांक पातळीवर पोहोचल्या असून यामध्ये रोज वाढ होत आहे.

विविध राज्यांतील मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि स्थानिक करांनुसार दरांमध्ये थोडाफार फरक आहे. अंदमान-निकोबारमधील पोर्ट ब्लेअर येथे डिझेल सर्वात स्वस्त म्हणजे जवळपास ६३.३५ रुपये प्रतिलिटर इतके आहे. तर गोव्यामध्ये पेट्रोल सर्वात स्वस्त म्हणजे जवळपास ७० रुपये प्रतिलिटर इतके आहे.

१२ मे रोजी कर्नाटकमध्ये मतदान झाल्यानंतर लगेचच इंधन दरवाढ सुरू करण्यात आली आहे. कर्नाटकमधील निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढतील अशी शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात येत होती. गेल्या वर्षी गुजरात निवडणुकांनंतरही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सारख्या कंपन्यांनी तेथे जवळपास १५ दिवस सातत्याने एक ते तीन पैशांची कपात केली होती. मात्र, मतदानानंतर तेथेही दरवाढ झाली होती.