देशभरातील पेट्रोल पंप चालकानी संप मागे घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलणार असून याच्या निषेधार्थ देशभरातील पेट्रोल पंप चालक १६ जूनपासून संपावर जाणार होते. तर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी १६ जूनपासून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलणारच असे स्पष्टीकरण दिले आहे.

जगातील बहुतांश प्रगत बाजारांप्रमाणे भारतातही १६ जूनपासून आंतरराष्ट्रीय दरांशी सुसंसगतता राखून देशभरातील पेट्रोल व डिझेलचे दर दररोज निश्चित करण्यात येणार आहे. पाच शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवल्यानंतर १६ जूनपासून सरकारी तेल कंपन्या देशभरातील सर्व म्हणजे ५८ हजार पेट्रोल पंपावरील पेट्रोल व डिझेलच्या दररोज आढावा घेणार आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतीतील चढउतार आणि विदेशी चलनाच्या विनिमय दरातील बदल यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलवच्या किमतीमध्ये काही पैशांनी बदलतील.

इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम कंपन्यांनी मार्जिनल डिफरन्शिअल प्राइसिंगचे धोरण राबवण्याचे ठरवले. पेट्रोल पंपांगणिक हे दर बदलत राहतील. या निर्णयाला पेट्रोल वितरकांनी विरोध दर्शवला होता. याविरोधात १६ जूनपासून संपावर जाण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. ऑइल कंपन्यांकडून पेट्रोल विकत न घेण्याचा निर्णय वितरकांनी घेतला होता. मात्र मंगळवारी पेट्रोल वितरकांनी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.