भारतातील तब्बल ४१,००० पेट्रोल पंपांवर आता पेटीएमद्वारे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. नोटाबंदीनंतर चर्चेत आलेल्या पेटीएम या पेमेंट अॅपने पेट्रोल पंपांसोबत करार केला आहे. यामुळे ग्राहकांजवळ रोकड किंवा कार्ड नसले तरी व्यवहार सुरळीत होतील. पेटीएमसोबत झालेल्या कराराचे पेट्रोल पंप चालकांनी स्वागत केले आहे. सध्या देशभरात कॅशलेस व्यवहाराचे वारे वाहत आहे. त्या पार्श्वभूमीवर पेटीएमच्या वापरामध्ये २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सध्या पेटीएम हे १० प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. पेटीएमच्या ऑफलाइन सेवेचा लाभ २० लाखांपेक्षा अधिक दुकानदार घेत आहेत. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डांच्या व्यवहारांवर १ टक्का अतिरिक्त शुल्क लागेल असा निर्णय बॅंकांनी घेतला होता. जर बॅंकांनी हा निर्णय परत घेतला नाही तर आम्ही कार्डचे व्यवहार स्वीकारणार नाही असा पवित्रा घेतल्यानंतर बॅंकांना नमते घेत यावर पुनर्विचार करावा लागला. देशामध्ये पेट्रोल पंपावर पॉइंट ऑफ सेल मशीनचा वापर केला जातो.

पेट्रोल पंपावरील बहुतांश पीओएस मशीन या एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बॅंकांनी पुरवलेल्या आहेत. पेट्रोल भरल्यानंतर कार्डचा वापर झाल्यास त्यावर १ टक्का अतिरिक्त शुल्क लागेल अशी नोटीस बॅंकांनी पाठवली होती. एकीकडे कॅशलेस व्यवहारांना प्रेरणा मिळावी म्हणून सरकार विविध उपाय योजना आणत आहे तर दुसऱ्या बाजूला बॅंका आमच्यावर कर लादत आहे असे म्हणत ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनने कार्ड व्यवहार करणार नसल्याचे ठणकावून सांगितले होते. यामध्ये केंद्र सरकारलाच हस्तक्षेप करावा लागला. कार्डच्या व्यवहारावर कुठलेही अतिरिक्त शुल्क लावले जाणार नाही असे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केल्यानंतर हा वाद निवळला.

तरीदेखील कार्ड व्यवहारावरील अतिरिक्त कराचा भुर्दंड कुणावर येऊन पडेल याबाबत एकमत होत नव्हते. पेट्रोल पंप डीलर्स, बॅंका, ग्राहक की सरकार नेमका कुणावर या अतिरिक्त शुल्काचा भार पडेल याबाबत बोलणी सुरू होती. याच पार्श्वभूमीवर पेटीएमने पेट्रोल पंपांसमोर योग्य प्रस्ताव ठेवला आणि हा प्रस्ताव पेट्रोल पंपांनी स्वीकारला, असे पेटीएमचे उपाध्यक्ष किरण वासीरेड्डी यांनी म्हटले. आमच्या सेवा या अतिशय उपयुक्त असून वापरण्यास देखील सोप्या असल्याचे वासीरेड्डी यांनी म्हटले. या व्यतिरिक्त देशातील सुमारे २०० गावे कॅशलेस व्हावी याकरिता पेटीएम काम करीत आहे.