‘फायझर’ची करोनाप्रतिबंधक लस भारतात वापरण्यासाठी कंपनीने औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे. ब्रिटनने या लशीला आधीच परवानगी दिली असून एखाद्या देशात परवानगी मिळालेली करोनावरची ती पहिली लस ठरली आहे.

आता भारताने या लशीला परवानगी दिली तर ती येथेही उपलब्ध होईल, पण आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी या लशीची गरज नसल्याचे प्रतिपादन यापूर्वी केले आहे. आपल्याकडे २—३ लशींची निर्मिती होत असताना या महागडय़ा लशीची खरेदी करण्यात स्वारस्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते. ही लस साठवण्यासाठी उणे ७० अंश तापमान लागते.

ब्रिटनमध्ये मंगळवारपासून फायझर  लशीच्या मदतीने कोविड १९ लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. बहारिननेही या लशीला मान्यता दिली असून फायझरने भारतातही  ही लस निर्यात करता यावी यासाठी औषध महानियंत्रकांकडे परवानगी मागितली आहे. नवीन औषधे व वैद्यकीय चाचण्या नियम २०१९ मधील विशेष तरतुदीखाली फायझर कंपनीने परवानगीसाठी अर्ज केला आहे. फायझरने ४ डिसेंबरलाच औषध महानियंत्रकांकडम्े आपत्कालीन परवानगी मागितली असून  फायझर व बायोएनटेकची कोविड १९ एमआरएनए लस भारतात पाठवण्याची तयारी दर्शवली आहे.

ही लस ९५ टक्के सुरक्षा देणारी असून बहारिनने शुक्रवारी या लशीला परवानगी दिली होती. २१ दिवसांनी दिल्या जाणाऱ्या दोन मात्रांची लस  साठवण्यास उणे ७० अंश तापमान लागते, शिवाय तिची किंमतही तीन हजार रुपयांच्या आसपास आहे.

अन्य लशींची स्थिती

दरम्यान सीरम इन्स्टिटय़ूट  ऑफ इंडियाने तयार केलेल्या ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी मिळाली आहे. झायडस कॅडिलाच्या देशी करोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यांना परवानगी मिळाली आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज व रशियाच्या डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांनी स्पुटनिक ५ लशीची निर्मिती भारतात करण्याचे ठरवले असून त्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. बायोलॉजिकल ई  कंपनीने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू केल्या आहेत.