News Flash

प्रतिपिंडांमध्ये तीन महिन्यांनी घट

अठरा वर्षांवरील सहाशे जणांचा अभ्यास केल्यानंतर  हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

प्रतिपिंडांमध्ये तीन महिन्यांनी घट

फायझर, अ‍ॅस्ट्राझेनेका लशींबाबत अभ्यास

लंडन : फायझर व अ‍ॅस्ट्राझेनेका लशीने तयार झालेले करोना विषाणू विरोधी प्रतिपिंड सहा आठवडय़ात कमी होण्यास सुरुवात होते व दहाव्या आठवडय़ापर्यंत ते पन्नास टक्क्यांच्या खाली जातात असे लॅन्सेट या नियतकालिकाने म्हटले आहे.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन या संस्थेने म्हटले आहे की, जर प्रतिपिंडे या वेगाने कमी होत असतील तर या लशीमुळे मिळणारे संरक्षण कमी होत जाणार आहे. त्यातच विषाणूचे नवीन प्रकार सामोरे येत आहेत.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या अभ्यासात म्हटले आहे की, फायझर लशीच्या दोन मात्रा अ‍ॅस्ट्राझेनेका लशीच्या दोन मात्रांनंतर घेतल्या तर प्रतिपिंडाचे प्रमाण जास्त राहते. त्यामुळे गंभीर कोविडपासून रक्षण करण्यासाठी या लशीच्या दोन दोन मात्रा आवश्यक आहेत असे आरोग्य विभागाच्या संशोधक मधुमिता श्रोत्री यांनी म्हटले आहे. करोना प्रतिबंधक फायझर व अ‍ॅस्ट्राझेनेका (कोव्हिशिल्ड) या लशींच्या मात्रा घेतल्यानंतर दोन ते तीन महिन्यात प्रतिपिंड कमी होतात. अठरा वर्षांवरील सहाशे जणांचा अभ्यास केल्यानंतर  हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. यात व्यक्तींचे वय, त्यांना असणारे इतर रोग यांचा विचार करण्यात आला नव्हता. प्रतिपिंडाचे प्रमाण कमी होत असले तरी या लशींची परिणामकारकता कमी होत नाही, असा दावा अभ्यासात करण्यात आला आहे.

फायझरचे प्रतिपिंडाचे प्रमाण २१ ते ४१ दिवसात मिलिलिटरला ७५०६ होते ते सत्तराव्या दिवशी ३३२० झाले तर अ‍ॅस्ट्राझेनेकात हे प्रमाण २० व्या दिवशी  १२०१ होते ते  सत्तराव्या दिवशी १९० इतके कमी झाले, याचा अर्थ प्रतिपिंडांचे प्रमाण पाच पटींनी कमी झाले.

फ्रान्समधील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचा सक्तीच्या लसीकरणाला विरोध

एपी, पॅरिस

फ्रान्समधील बहुतांश आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे करोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आलेले असले, तरी त्यापैकी काही जण अनिवार्य लसीकरणाला विरोध करत आहेत. देशात करोनाचा झपाटय़ाने फैलाव होत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना लस घेणे अनिवार्य करणाऱ्या नव्या कायद्यामुळे त्यांच्यातील असंतोष वाढत आहे.

फ्रान्सने करोना महासाथीच्या चौथ्या लाटेत अधिकृतरीत्या प्रवेश केला असल्याचे तेथील सरकारने जाहीर केले असून; रुग्णालयांना त्यापासून संरक्षित ठेवण्यासाठी आणि पुन्हा टाळेबंदी टाळण्यासाठी आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना करोना प्रतिबंधक लस घेणे अनिवार्य करणारा कायदा केला आहे.

संसदेने सोमवारी मंजूर केलेल्या या कायद्यान्वये उपाहारगृहे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी ‘आरोग्य पास’ची तरतूद करण्यात आली आहे. या दोन्ही उपाययोजनांमुळे वाद उद्भवला असून गेले दोन आठवडाअखेर देशभर निदर्शने करण्यात येत आहेत. पांढरे कोट घातलेले आरोग्य सेवा कर्मचारी त्यात सहभागी होत आहेत. लशींना विरोध करताना,  आंतरजालावर असलेल्या चुकीच्या माहितीचा अनेक जण हवाला देत आहेत,  दीर्घकालीन परिणामांबाबत चिंता व्यक्त करत आहेत किंवा निर्णयासाठी अधिक वेळ मागत आहेत.

ब्राझीलकडून कोव्हॅक्सिनचा परवाना रद्द

हैदराबाद : ब्राझीलमध्ये कोव्हॅक्सिन खरेदीतील घोटाळ्यानंतर ही लस तयार करणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीने त्या देशातील भागीदार कंपन्यांबरोबरचा करार रद्द केला होता. आता कोव्हॅक्सिन या लशीचा आपत्कालीन परवाना ब्राझीलने रद्द केला आहे. भारतीय कंपनीच्या विनंतीनुसार या लशीला परवानगी देण्यात आली होती.

ब्राझीलच्या औषध नियंत्रकांनी म्हटले आहे की, ब्राझीलमधील कंपन्यांशी भारत  बायोटेकने केलेला करार रद्द झाल्यानंतर आपत्कालीन परवाना रद्द करण्यात येत आहे. अ‍ॅनव्हिसा  या  राष्ट्रीय आरोग्य पाहणी संस्थेने म्हटले आहे की, त्यांच्या संचालक मंडळाने कोव्हॅक्सिनचा आपत्कालीन परवाना रद्द केला आहे. हा परवाना प्रायोगिक पातळीवर देण्यात आला होता. त्याआधी अ‍ॅनव्हिसा या संस्थेने कोव्हॅक्सिनच्या चाचण्याही थांबवल्या होत्या. प्रेसिसा मेडिकॅमेन्टॉस व एनव्हिक्सिया  फार्मास्युटिकल्स या कंपन्यांशी ब्राझीलमधील बाजारपेठेत लशीची विक्री करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला होता. ब्राझील सरकारला या लशीचे दोन कोटी डोस पुरवण्यात येणार होते. कोव्हॅक्सिन लशीच्या खरेदीत  सरकारने घोटाळे केल्याचा आरोप होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2021 2:49 am

Web Title: pfizer astrazeneca vaccine antibody levels may decline after 3 months zws 70
Next Stories
1 नजीकच्या काळात करोनापेक्षा भयंकर विषाणूंना रोखण्याची अमेरिकेची तयारी
2 ‘पेगॅसस’प्रकरणी ज्येष्ठ पत्रकार सर्वोच्च न्यायालयात
3 मिझोरामविरोधात आसाम सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार: सरमा
Just Now!
X