जगभरात करोना व्हायरसचा उद्रेक सुरु आहे. तसंच या आजारावर लस शोधण्याचंही काम सुरु आहे. अशात एक चांगली बातमी समोर आली आहे. ब्रिटनमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ब्रिटनने Pfizer BioNTech लसीच्या वापराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आजपासून ब्रिटनमध्ये लसीकरण सुरु झालं आहे. ९० वर्षांच्या आजींना करोना प्रतिबंध रोखणाऱ्या पहिली लस देण्यात आली आहे. ही महिला फायझर/बायोएनटेक कोविड लस घेणारी जगातली पहिली महिला ठरली आहे. मार्गारेट कीनन असं या ९० वर्षीय आजींचं नाव आहे.

काय म्हणाल्या मार्गरेट?
कॉवेन्ट्री विद्यापीठाच्या दवाखान्यात मी कोविडचा प्रतिबंध करणारी लस घेतली. यूकेमध्ये ८० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसह, आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचं लसीकरण केलं जाणार आहे. करोनावरची लस घेणारी मी जगातली पहिली व्यक्ती ठरल्याने मला चांगलं वाटतं आहे. माझ्यासाठी आजचा दिवस माझ्या वाढदिवसासारखाच आहे. मी इथल्या कर्मचाऱ्यांचे आभार मानते. मार्गरेट यांचा वाढदिवस पुढील आठवड्यात आहे मात्र त्यांनी आजच वाढदिवस आहे असं वाटत असल्याचं म्हटलं आहे.

ब्रिटनमध्ये फायझर बायोएटेकच्या लसीच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. ही लस ९५ टक्के प्रभावी आहे असं सांगितलं जातं आहे. या लसीचा वापर सर्वप्रथम उच्च प्राथमिकता असलेल्या लोकांवर आणि रुग्णांवर केला जाणार असल्याचं ब्रिटन प्रशासनाने आधीच स्पष्ट केलं आहे. ब्रिटनने आपल्या दोन कोटी लोकसंख्येसाठी प्रत्येकी दोन डोस अशा चार कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. यातले एक कोटी डोस हे येत्या काही दिवसांमध्येच येणार आहेत, बाकीचे डोस त्यानंतर येतील असंही ब्रिटन प्रशासनाने म्हटलं आहे.

ब्रिटनमध्ये लसीकरण सुरु झाले आहे तरीही लोकांनी योग्य ती सर्व खबरादारी घ्यावी. सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर आवर्जून करावा तसेच सॅनेटायझरही वापरावं असंही आवाहन ब्रिटनच्या प्रशासनाने केलं आहे.