जगभर आतापर्यंत सुमारे १० लाख लोकांचा बळी घेणाऱ्या करोना विषाणूच्या प्रतिबंधाबाबत दिलासादायक माहिती फायझर कंपनीने सोमवारी दिली. कंपनीने तयार केलेली लस ९० टक्के परिणामकारक ठरू शकते, असे कंपनीने सांगितले.

फायझर आणि तिची जर्मन सहयोगी कंपनी बायोएनटेक यांनी ही लस संयुक्तपणे तयार केली आहे. ती ९० टक्के परिणामकारक ठरू शकेल, असे प्राथमिक निष्कर्ष असल्याचे फायझर कंपनीने सांगितले. लशीचा उपयोग १६ ते ८५ वयोगटातील लोकांवर तातडीने करण्यासाठी या महिनाअखेरीस अमेरिकेच्या नियंत्रकांकडे अर्ज करण्याचे संकेतही कंपनीने दिले आहेत.

तथापि, लस तयार आहे असा सोमवारी करण्यात आलेल्या या घोषणेचा अर्थ नाही. माहितीवर देखरेख ठेवणाऱ्या स्वतंत्र मंडळाने केलेल्या अंतरिम विश्लेषणात लशीच्या तपासणीत ९४ जणांच्या चाचण्याचा आढावा घेण्यात आला. अमेरिकेसह इतर ५ देशांमधील सुमारे ४४ हजार लोकांची या अभ्यासासाठी नोंदणी करण्यात आली आहे.

चाचण्यांबाबत फायझरने अधिक तपशील दिले नाहीत. संरक्षणाचे प्राथमिक प्रमाण अभ्यास संपेपर्यंत बदलू शकते, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

‘‘काही आशादायक बातमी देण्याच्या स्थितीत आम्ही आहोत. त्यामुळे आमचा उत्साह दुणावला आहे, असे ‘फायझर’च्या नैदानिक विकास विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. बिल ग्रुबर यांनी ‘असोसिएटेड प्रेस’ या वृत्तसंस्थेला सांगितले.

करोना या जागतिक संकटाच्या अंतासाठी महान शोधाची गरज असताना आम्ही त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, असे फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बॉरुला यांनी म्हटले आहे.

हे वर्ष संपण्या आधी कोणतीही करोना प्रतिबंधक लस येण्याची शक्यता नाही, सुरुवातीला या लशीच्या मर्यादित पुरवठय़ाचे रेशनिंग केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

जगभरात ज्या लस उत्पादक कंपन्या चाचणीच्या पुढील टप्प्यांत आहेत, त्यात फायझर आणि तिची जर्मन सहयोगी कंपनी ‘बायोएनटेक’ यांचा समावेश आहे. ही लस या दोन कंपन्यांनी संयुक्तपणे तयार केली आहे.

निष्कर्ष असे..

* लशीचा पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी आणि दुसरा डोस दिल्यानंतर सात दिवसांत रुग्णांमध्ये करोना प्रतिकारशक्ती तयार झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

* तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांच्या निष्कर्षांनुसार, करोना विषाणूला प्रतिबंध करण्याची क्षमता लशीमध्ये असल्याचे प्राथमिक पुरावे मिळाल्याचे फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बॉरुला यांनी सांगितले.