भारतात अमेरिकी कंपनी फायझरच्या करोनावरील लसीला मंजुरी मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अल्बर्ट बोर्ला यांनी एएनआयला ही माहिती दिली आहे.

भारतात वापरल्या जाणाऱ्या कोविड-19 लसीसाठी फायझरच्या लसीला मंजुरी मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मी अपेक्षा करतो की लवकरच सरकार सोबतच्या करराला अंतिम रूप दिलं जाईल. असं अल्बर्ट बोर्ला यांनी सांगितलं आहे.

३ फेब्रुवारी रोजी, भारताच्या औषध नियामक अंतर्गत असणाऱ्या तज्ञ संस्थांनी फायझरच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी नाकारली होती. त्यानंतर अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनीने आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर १३ एप्रिल रोजी, जेव्हा  देशात दुसऱ्या लाटेचा प्रभाव जाणवू लागला तेव्हा लसींचा तुटवडा निर्माण झाला. तेव्हा सरकारने आपला पूर्वीचा निर्णय मागे घेतला. त्यानंतर या लसींच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील  चाचण्यांसाठी कोणतीही अट लागू केली जाणार नाही अशी सूचना केली. जागतिक आरोग्य संघटनेने या कंपन्यांना परवानगी दिल्यानंतर लस पुरवणाऱ्या अमेरिका, इंग्लड आणि अन्य देशांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.

फायझर, ऑक्सफर्ड लशी ‘डेल्टा’वर परिणामकारक

तर, भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा या करोना विषाणूवर अमेरिकेची फायझर तसेच ब्रिटनमध्ये तयार झालेली ऑक्सफर्डची अ‍ॅस्ट्राझेनेका लस परिणामकारक आहे. डेल्टा विषाणमुळे आधीच्या विषाणूपेक्षा रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण दुप्पट असूनही या लसी त्या विषाणूवर परिणामकारक ठरल्या आहेत.