दिल्लीत लशीची प्रचंड कमतरता जाणवत आहे. कोव्हॅक्सिनचा साठा १३ दिवसांपासून संपला आहे. आज कोविशिल्ड लसही संपली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन लस उत्पादक कंपन्या- PFIZER आणि Moderna यांनी दिल्लीला लस देण्यास नकार दिला आहे. याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. आज (सोमवार) केजरीवाल म्हणाले, आम्ही लस विकत घेण्याबाबत PFIZER आणि Moderna यांच्याशी चर्चा केली होती. परंतु त्यांनी नकार देत आम्ही केंद्र सरकारशी बोलणार असल्याचे सांगितले.

यापुर्वी पंजाब सरकारनेही लशीसाठी Moderna कंपनीशी संपर्क साधला होता. पंजाबचे वरिष्ठ आयएएस आणि कोविड लसीकरणाचे नोडल अधिकारी विकास गर्ग यांनी रविवारी सांगितले की, सरकारने लशीबाबत Moderna कंपनीशी संपर्क साधला होता, परंतु कंपनीने त्यांच्याशी थेट व्यवहार करण्यास नकार दिला आणि ते लशीबाबत केंद्राशी बोलणार असल्याचे सांगितले.

सध्या देशातील दोन कंपन्या भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट लस तयार करत आहेत. परंतु वाढत्या मागणीमुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मार्च-एप्रिलमध्ये भारताने इतरही अनेक देशांमध्ये लशींची निर्यात केली आहे. परंतु कोरोनाच्या दुसर्‍या लाटे दरम्यान सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्यात देशात लशीचा अभाव आहे.

भारतीय औषध नियंत्रक जनरल यांनी रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे, परंतु पुरवठा प्रश्न अजूनही कायम आहे. अशा परिस्थितीत, राज्ये स्वत: परदेशी कंपन्यांशी संपर्क साधून या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु सध्या कोणताही मार्ग सापडलेला नाही किंवा लशीरणाची गतीही सुधारत नाही आहे.