अमेरिकेत  कोविड १९ सल्लागार गटाने फायझरची कोविड १९ प्रतिबंधक लस वापरण्याची शिफारस  केली आहे. आठ तासांच्या सार्वजनिक सुनावणीनंतर फायझर लशीच्या वापरास अन्न व औषध प्रशासनाच्या लशी  व संबंधित जैविक घटक वापर समितीने १७ विरुद्ध ४ मतांनी मंजुरी दिली असून १ सदस्य तटस्थ राहिला.

ही लस फायझर व त्यांच्या बायोएनटेक या जर्मन भागीदार कंपनीने तयार केली आहे. चिल्ड्रेन्स हॉस्पिटल ऑफ फिलाडेल्फिया या संस्थेचे लस तज्ज्ञ पॉल ऑफिट यांनी म्हटले आहे, की लशीचे फायदे दिसून आले असून त्याता काही सैद्धांतिक जोखिमा असू शकतात. बाल संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ ओफर लेवी यांनी सांगितले, की ही लस निश्चितच फायदेशीर आहे. जोखमीपेक्षा फायदे नक्कीच अधिक आहेत. हा एक मैलाचा दगड असून आता या लशीला अन्न व औषध प्रशासनाने मंजुरी देण्याची गरज आहे. करोना लस तयार करुन तिची साठवणूक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील आठवडय़ात अन्न व औषध प्रशासन या लशीला मंजुरी देईल, अशी अपेक्षा आहे.

फायझरच्या लशीला ब्रिटनमध्ये परवानगी मिळाली असून कॅनडा, बहारिन यांनीही परवानगी दिली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त स्टीफन एम हान यांनी सांगितले, की आपत्कालीन वापरासाठी परवानगी देताना आम्ही तज्ज्ञ समितीने दिलेली माहिती विचारात घेणार आहोत. या लशीची सुरक्षितता व परिणामकारकता या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

उत्पादन, वितरणाचे आव्हान- बायडेन

अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले, की करोनामुळे अतिशय काळ्याकुट्ट बनलेल्या अशा कालखंडात ही मंजुरी मिळाली हे चांगलेच झाले. आम्ही वैज्ञानिक, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ यांचे आभारी आहोत. त्यांनी राजकीय दबाव न घेता या लशीचे मूल्यमापन केले आहे.आता या लशीचे उत्पादन वाढवणे व वितरण करणे हे मोठे आव्हान आहे.