News Flash

भारताला लस पुरवठा करु पण…; अमेरिकेच्या ‘फायजर’ कंपनीने घातली अट

करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने भारत सरकारने इतर पर्याय शोधण्यास सुरुवात केलीय

(फोटो सौजन्य: रॉयटर्सवरुन साभार)

भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी भारतामध्ये २४ तासांमध्ये तीन लाखांहून अधिक करोना रुग्ण आढळून आले आहेत. भारतामध्ये कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या भारतात निर्माण होणाऱ्या लसींच्या माध्यमातून लसीकरण मोहिम मागील तीन महिन्यांपासून सुरु करण्यात आली आहे. असं असतानाही सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती फारशी समाधानकारक नसून चिंताजनक होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने आता इतर देशांमधून लसी विकत घेण्यासाठी तयारी सुरु केली आहे. अमेरिकेतील फायजर कंपनीने भारताला लस देण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यासंदर्भात त्यांनी एक महत्वाची अट घातली आहे.

रशियन बनावटीच्या स्फुटनिक लसीच्या निर्मितीला परवानगी दिल्यानंतर आता भारताची नजर अमेरिकितील फायजर कंपनीच्या लसीकडे लागली आहे. त्यातच आज फायजरने भारतामध्ये लस देण्यासंदर्भात भाष्य करत लस देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यावेळी त्यांनी भारतात देण्यात येणाऱ्या लसी या केवळ सरकारी पुरवठा साखळीच्या माध्यमातून दिल्या जातील असं स्पष्ट केलं आहे. म्हणजेच बायोटेकच्या मदतीने विकसित करण्यात आलेल्या अमेरिकेतील फायजर ही लस भारतामध्ये केवळ सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “करोना बाधितांची वाढती संख्या पाहून फायजर आपल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राधान्याने सरकारी यंत्रणेला लस पुरवठा करणार आहे. केवळ सरकारी कंत्राटाद्वारेच कंपनी भारतामध्ये करोना लसींचा पुरवठा करणार आहे.”

भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नियोजित दोन लसींसोबतच इतर पर्यायांचाही भारत सरकारकडून विचार केला जात असल्याच्या बातम्या समोर येत आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील कंपन्यांना थेट परदेशी कंपन्यांकडून लस घेऊ देण्याची परवानगी देण्यासंदर्भातील विचार सुरु असल्याचे समजते. मात्र फायजरच्या लसीची किंमत ४० डॉलर म्हणजेच तीन हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. भारतामधील कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींची किंमत ३०० रुपयांपर्यंत आहेत.

लसीकरणाच्या बाबतीत भारताने चीन आणि अमेरिकेला मागे टाकत पहिला क्रमांकांवर झेप घेतली आहे. मागील ९२ दिवसांमध्ये भारतात १२ कोटी २६ लाखांहून अधिक जणांना करोना लस देण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये इतकं लसीकरण करण्यासाठी ९७ तर चीनमध्ये १०८ दिवस लागले होते. उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील एक कोटींहून अधिक व्यक्तींना लस देण्यात आली आहे. दिवसाला सर्वाधिक लसी देणाऱ्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 5:46 pm

Web Title: pfizer will supply covid 19 vaccine only through government channels scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ऑक्सिजनच्या वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नसणार; केंद्र सरकारचे निर्देश
2 “बंगाल दिल्लीच्या दोन गुंडांना सोपवू शकत नाही”, ममता बॅनर्जींचा भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा!
3 “घरी विलगीकरणात आहे आणि सतत वाईट बातम्या येत आहेत…”; राहुल गांधींनी केलं ट्विट
Just Now!
X