फायझरच्या उत्पादनास औषध नियंत्रकांची मान्यता

फायझरच्या कोविड १९ लशीचा वापर १२ वर्षांपासूनच्या मुलांवर करण्यास अमेरिकी औषध नियंत्रकांनी मान्यता दिली असून शाळेत परतण्यापूर्वी किशोरवयीन मुलांना या लशीचा लाभ होणार आहे. त्यामुळे तेथील शाळांचे कामकाज सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

गुरुवारपासून मुलांना लस देण्यास सुरुवात केली जाणार असून संघराज्य लस सल्लागार समितीने दोन मात्रांच्या फायझर लशीची शिफारस १२ ते १५ वयोगटातील मुलांसाठी केली आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात येणार आहे.

जगातील अनेक कोविड लशींचा वापर प्रौढांसाठी करण्याकरिता मान्यता मिळाली आहे. फायझरची लस अनेक देशात आतापर्यंत १६ वर्षांवरील मुलांमध्ये वापरण्यात आली आहे. कॅनडाने अलीकडेच १२ व त्यावरील वयाच्या मुलांसाठी लशीचा वापर करण्यास परवानगी दिली आहे.

पालक व शाळा प्रशासन तसेच सार्वजनिक आरोग्य अधिकारी मुलांसाठी लशीला केव्हा परवाना दिला जातो याची वाटच पाहात होते. कोविड १९ साथ हाताळण्याच्या घटनाक्रमात हा एक मोठा निर्णय असून फायझरचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. बिल ग्रबर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अन्न व औषध प्रशासनाने सांगितले की, ही लस सुरक्षित असून मुलांना कोविडपासून संरक्षण मिळणार आहे. १२ ते १५ वयोगटातील दोन हजार अमेरिकी मुलांवर या लशीचे प्रयोग करण्यात आले असून ज्यांना लस देण्यात आली त्यांच्यात कोविडची लक्षणे दिसली नाहीत. यापूर्वीच्या प्रयोगांपेक्षा आताच्या चाचण्यांत मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिपिंडे निर्माण झालेली दिसून आली. मुलांना प्रौढांइतक्याच प्रमाणात लस चाचण्यात दिली गेली त्यात त्यांच्यामध्ये ताप, थंडी वाजून येणे, अंगदुखी अशी लक्षणे दुसऱ्या मात्रेनंतर दिसली आहेत.

युरोपीय समुदायातही मुलांसाठी या लशीला मान्यता देण्यात यावी, असे आवाहन फायझर व बायोएनटेक यांनी केले आहे. मुलांसाठी लशीला परवानगी मिळणे गरजेचे होते, कारण त्यामुळे सार्वजनिक आरोग्यावरचा अतिरिक्त ताण कमी होणार आहे. -डॉ. पीटर मार्कस, अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाचे लसप्रमुख