भारतातील ब्रिटीश उच्चायुक्तपदाची सूत्रे फिलीप बार्टन यांनी बुधवारी हाती घेतली. फेब्रुवारी महिन्यात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पदभार स्विकारण्यास त्यांना विलंब झाला.

बुधवारी एका आभासी (व्हर्च्युअल) कार्यक्रमात बार्टन यांनी आवश्यक कागदपत्रे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सुपूर्द करीत सूत्रे हाती घेतली.

आपल्या आजवरच्या कारकीर्दीतील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे बार्टन यांनी या वेळी सांगितले. दोन देशांतील हितसंबंध जोपासण्यासोबतच व्यापार आणि आर्थिक बाजू वृद्धींगत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. दोन्ही

देश सुरक्षेच्या प्रश्नावर एकत्रितपणे काम करतील, अशी हमी त्यांनी दिली. ‘करोनासंकटकाळात मी ही जबाबदारी स्वीकारत असल्याचे भान मला आहे. या कठीण काळात दोन्ही देशांच्या समन्वयातून करोनासाठी लस निर्मिती करण्याचाही प्रयत्न केला जाईल. तसेच देशांच्या भरभराटीसाठी माझे योगदान राहील’, असे ते म्हणाले.

दोन्ही देशांच्या घनिष्ट संबंधांविषयी बोलताना त्यांनी आपल्या कुटुंबियांचा उल्लेख केला. ते भारतासाठी काम असतानाच त्यांचा विवाह झाला होता. बार्टन यांनी आपल्या मुलीचे नाव ‘इंडिया’ असे ठेवले आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या आईचा जन्म हिमाचल प्रदेशातील शिमला येथे झाला होता. यापूर्वीही त्यांनी दिल्लीत काम केले आहे. त्यांनी वॉशिंग्टनमध्ये उप राजदूत म्हणून काम केले आहे. २०१४ ते २०१६ या काळात ते पाकिस्तानचे ब्रिटीश उच्चायुक्तही राहिले आहेत.