प्रवाशांनी भरलेली फेरी बोट आणि मालवाहू जहाज यांची टक्कर होऊन फेरी बोट त्वरित बुडाल्याने १७१ जण बेपत्ता होण्याची घटना फिलिपाइन्समध्ये घडली आहे. मात्र बेपत्ता झालेल्या प्रवाशांच्या शोधासाठी हाती घेण्यात आलेली मोहीम वादळी हवामानामुळे स्थगित करावी लागली आहे. या दुर्घटनेत अन्य ३१ जण ठार झाल्याचे वृत्त आहे.
सेंट थॉमस अ‍ॅक्विनस ही फेरी बोट ८३१ प्रवासी आणि खलाशांना घेऊन जात असताना ती सेबू बंदराजवळच्या समुद्रात मालवाहू जहाजावर आदळली. या घटनेची खबर मिळताच तटरक्षक दल आणि लष्कराच्या नौकांनी त्याचप्रमाणे स्थानिक मच्छीमारांनी ६२९ प्रवाशांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र खराब हवामानामुळे अन्य १७१ प्रवाशांचा शोध घेण्याची मोहीम स्थगित करावी लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.