फिलिपाइन्समधील मिंडनाओ येथे आयसिस या दहशतवादी संघटनेत भरती झालेल्या भारतीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मिंडनाओमध्ये फिलिपाइन्स सैन्याने आयसिसविरोधात मोहीम सुरु केली असून या मोहीमेदरम्यान त्याचा खात्मा झाल्याची शक्यता भारतीय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

मिंडनाओ प्रांतातील मारावी या शहरात आयसिसचे समर्थन करणाऱ्या दहशतवादी संघटनेचे वर्चस्व आहे. आयसिसचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी या शहरात फिलिपाइन्स सैन्याची मोहीम सुरु आहे. फिलिपाइन्स सैन्यासोबतच्या चकमकीत आयसिसच्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. यामध्ये भारतातून आयसिसमध्ये सामील होण्यासाठी फिलिपाइन्समध्ये गेलेल्या तरुणाचाही समावेश आहे. मुश्ताक असे या तरुणाचे नाव असून आम्ही संदर्भात माहिती घेत आहोत असे गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी ‘डेली मेल’ला सांगितले. मुश्ताक हा कोणत्या राज्यातील रहिवासी होता हे अजून स्पष्ट झालेले नाही.

मुश्ताकचा खात्मा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाल्यास दक्षिण- पूर्ण आशियात आयसिससाठी काम करणाऱ्या भारतीयाचा मृत्यू झाल्याची ही पहिली वेळ ठरणार आहे. भारतातून पश्चिम आशियात आयसिसमध्ये भरती होण्याची प्रमाण तुरळक असल्याचा दावा गुप्तचरण यंत्रणेतील अधिकारी करतात. ऑनलाइन आणि सोशल मीडीयाच्या माध्यमातून तरुणांचे ब्रेनवॉश केले जात असून हेच सुरक्षा यंत्रणांसमोरील प्रमुख आव्हान असल्याचे अधिकारी सांगतात. ब्रेनवॉश झाल्याने हे तरुण एकलकोंडे होतात आणि त्यांच्याकडून सुरक्षा यंत्रणांवर हल्ला होऊ शकतो अशी भीती अधिकारी वर्तवत आहेत.

‘आयसिससाठी ऑनलाइन प्रचार करणाऱ्यांवर आमची नजर आहे. भविष्यात त्यांच्यावर कारवाईदेखील होऊ शकते’ असा इशाराही सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी दिला आहे. लखनौमध्ये काही महिन्यांपूर्वी एका चकमकीत सैफुल्लाह नामक दहशतवाद्याचा खात्मा झाला होता. सैफुल्लाह हादेखील आयसिससाठी काम करत होता. तसेच आयसिसशी संबंधीत सहा संशयितांना पोलिसांनी देशाच्या विविध राज्यांमधून अटक केली होती. सैफुल्लाह आणि अटक झालेले सहा तरुण हे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आयसिसच्या प्रभावाखाली आले होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.