फिलिपाईन्समध्ये भारतीय वंशाच्या शीख दाम्पत्याची हत्या करण्यात आली आहे. फिलिपाईन्समधील कॅमेराईन्समध्ये ही घटना घडली असून बहागवंत बत्तर आणि जसविंदर कौर असे या दाम्पत्याचे नाव आहे. हे दोघेही मूळचे पंजाबचे आहेत. बाईकवरुन आलेल्या बाईकस्वारांनी त्यांची हत्या केली आहे.

सिपकॉलमध्ये राहणारे बहागवंत सिंग (४५ वर्ष) आणि त्यांची पत्नी जसविंद कौर (३५ वर्ष) हे दोघे घरातून फिरण्यासाठी बाहेर पडले.  यादरम्यान बाईकवरुन आलेल्या दोन बाईकस्वारांनी या दाम्पत्याला गाठले आणि त्यांची हत्या केली. या घटनेनंतर दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिताफीने या दोघांचा पाठलाग करुन त्यांना अटक केली. त्यांच्याकडून बंदुक आणि जीवंत काडतूस जप्त केले आहे. मार्व्हिन आणि रोडोल्फ अशी या आरोपींची नावे असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. हत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

शीख दाम्पत्याची हत्या झाल्याने फिलिपाईन्समधील भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी ऑगस्टमध्येही फिलिपाईन्समध्ये एका भारतीय तरुणाची हत्या करण्यात आली. हा तरुणही मुळचा पंजाबमधीलच होता. हत्या झाली त्याच्या काही दिवसांनी त्या तरुणाचे लग्न होणार होते. सुखविंदर सिंग उर्फ विक्की (२६ वर्ष) असे या तरुणाचे नाव होते. सुखविंदर व्याजाने पैसे देण्याच्या व्यवसायात कार्यरत होता.

फिलिपाईन्समध्ये गेल्या दशकभरात शेकडो पंजाबी नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. भारतीय वंशाचे हे नागरिक फिलिपाईलन्समध्ये व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय करतात. फिलिपाईन्समध्ये व्याजावर पैसे देण्याच्या व्यवसायात चांगलाच नफा मिळतो. त्यामुळे पंजाबी तरुण या व्यवसायाकडे आकर्षित होतात. ब-याचदा व्यावसायिक स्पर्धेतून हत्येची सुपारी देण्याचे प्रकारही घडतात असे स्थानिक पोलिसांनी सांगितले.