पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ३०० कोटींचा चुना लावून हिरे व्यापारी नीरव मोदी फरार झाला आहे. त्याच्यावर कारवाई कधी होणार हा प्रश्न विचारला जात असतानाच दाओस येथील दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत नीरव मोदीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवरून विरोधकांनी भाजपावर आरोपांच्या फैरी झाडल्या. मात्र या फोटोतून काहीही सिद्ध होत नाही असे स्पष्टीकरण आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहे. एवढेच नाही तर नीरव मोदीवर कठोर कारवाई होणार आहे असेही शहा यांनी स्पष्ट केले.

दावोसमधील परिषदेत जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते तेव्हा त्यांच्यासोबत नीरव मोदीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांना माहित असल्याशिवाय इतका मोठा घोटाळा होऊच शकत नाही असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केला. स्वतःला देशाचे चौकीदार म्हणवणारे नरेंद्र मोदी पकोडे तळण्याचे सल्ले युवा वर्गाला देतात. मात्र चौकीदार झोपा काढत असल्याने नीरव मोदी देश सोडून पळाला अशीही टीका कपिल सिब्बल यांनी केली. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही अशाच प्रकारे ट्विट करुन नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच नीरव मोदी आणि पंतप्रधान यांचे एकत्र फोटो कसे काय? असाही प्रश्न उपस्थित केला.

मात्र या फोटोंवरून काहीही सिद्ध होत नाही. तुम्हीही माझ्यासोबत बसू शकता तुमच्यापैकी कोणी गुन्हा केला तर त्याला मी जबाबदार असेन का? असा प्रतिप्रश्न अमित शहा यांनी उपस्थितांना विचारला. तसचे नीरव मोदीवर कारवाई होणारच असेही आश्वासन शहा यांनी दिले. नीरव मोदी प्रकरणात केंद्र सरकारने आधीच त्याच्या ५ हजार कोटींच्य संपत्तीवर टाच आणली आहे असेही अमित शहा यांनी स्पष्ट केले.

पीएनबी घोटाळा प्रकरणात सीबीआयनेही कारवाईची चक्रे वेगाने फिरवली आहेत. आत्तापर्यंत या घोटाळा प्रकरणात बँकेच्या सहा अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच नीरव मोदीची चौकशी करण्याच्या तयारीत आम्ही आहोत असेही सीबीआयने स्पष्ट केले आहे.