१९९४ मध्ये आलेल्या ‘लायन किंग’ या सिनेमातील एका दृश्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. याचं कारणही तसंच आहे. एका माकडाने आपल्या पिल्लाला आकाशाच्या दिशेने उंचावून धरल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा फोटो लायन किंग सिनेमातील राफिकी जेव्हा सिंबाला आकाशात उंचावून धरतो त्या दृश्याची आठवण करून देणारा आहे असे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे. या सिनेमातील राफिकी हे वृद्ध माकड सिंहाच्या पिल्लाचं नाव ठेवल्यानंतर त्याची ओळख सगळ्या प्राण्यांना करून देण्यासाठी उंचावून धरते असा प्रसंग आहे. याच प्रसंगाशी या फोटोची तुलना होते आहे.

‘लायन किंग सर्कल ऑफ लाइफ’ असं या सिनेमाचं नाव होतं. हा सिनेमाचा बच्चेकंपनीसह सगळ्यांनाच फार भावला होता. आता इतक्या वर्षांनी या सिनेमातील एका दृश्याशी साधर्म्य साधणारा एका माकडाचा फोटो व्हायरल होतो आहे. डेलिमेलनेही या संदर्भातले वृत्त दिले आहे.

फोटोग्राफर डाफना बेन नन यांनी हा फोटो आपल्या कॅमेरात कैद केला आहे. आपल्या नवजात पिल्लाला या माकडाने उचलून धरले आहे. एका भल्या मोठ्या दगडाजवळ हे माकड आले आहे आणि त्यानंतर ते आपल्या पिल्लाला उंचावून दाखवत आहे असा हा फोटो आहे. रिअल लाइफ आणि रिल लाइफमध्ये साधर्म्य सांगणारा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.