करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन करण्यात आलं. लॉकडाउनमुळे उद्योग-व्यवसाय बंद असल्याने अर्थचक्र ठप्प आहे. पण त्याचवेळी लॉकडाउनमुळे निर्सगामध्ये झालेले काही चांगले बदलही दिसून येत आहेत.

उत्तर प्रदेशात नागरिकांनी काही पर्वतांचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटो हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगाचे असल्याचे नागरिकांनी सांगितले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पंजाबच्या जालंधर शहरातून हिमालयातील धौलाधार रेंज दिसली होती.

भारतीय वन खात्यातील अधिकारी रमेश पांडे यांनी हिमालयाचे फोटो टि्वटरवर शेअर केले. त्यानंतर हे फोटो आता व्हायरल झाले आहेत.

“लॉकडाउन आणि अधून-मधून पडणाऱ्या पावसामुळे हवेचा दर्जा सुधारला आहे. वसंत विहार कॉलनीमध्ये राहणाऱ्या दुष्यंत यांनी सोमवारी सकाळी त्यांच्या घरातून हे फोटो काढले” अशी माहिती रमेश पांडे यांनी त्यांच्या टि्वटर हँडलवर दिली आहे.

भारतीय वन खात्याचे दुसरे अधिकारी परवीन कासवान यांनी सुद्धा हिमालयीन पर्वतरांगांचे फोटो शेअर केले आहेत. सहारनपूरपासून या पर्वतरांगा १५० ते २०० किलोमीटर अंतरावर आहेत असे परवीन कासवान यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

सहारनपूरची संपूर्ण पिढी घरातल्या मोठयांकडून इथून हिमालय दिसायचा हे ऐकत मोठी झाली आहे. आतापर्यंत जे ऐकले ते खरोखर प्रत्यक्षात समोर दिसत आहे. ३० वर्षात प्रथमच उत्तर प्रदेशातून ही बर्फाच्छादित हिमशखर दिसली आहेत.