देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील ग्रंथालयात पहिल्यांदाच एका महिला वकिलाची प्रतिमा लावण्यात येणार आहे. तुरुंगांमध्ये शिक्षा भोगत असणाऱ्या निरपराध कैद्यांसाठी त्या कैवारी ठरल्या होत्या. पुष्पा कपिला हिंगोरानी असे या वकील महिलेचे नाव असून त्यांनी न्यायालयात पहिल्यांदा जनहित याचिका दाखल केली होती. या घटनेमुळे आज अनेकांसाठी जलद न्यायाचे दरवाजे खुले झाले आहेत.


निरपराध असतानाही न्यायालयाच्या निकालाच्या प्रतिक्षेत जीवनातील कित्येक वर्षे तुरुंगात घालवणारे अनेक लोक आहेत. अशा लोकांच्या चारित्र्यावर लागलेल्या डागांसह ते जीवन जगत असतात. त्यांचे घर, कुटुंब आणि नातेवाईकांनाही समाज त्यांच्याशी जोडू पाहतो. या सर्व कष्टाचे जीवन जगल्यानंतर एक दिवस न्यायालयाचा निर्णय येतो की, तुम्हाला आदरपुर्वक मुक्त केले जाते. अशा वेळी हा न्याय एक प्रकारची थट्टाच वाटते. कारण, तुरुंगातून निर्दोष सुटल्यानंतरही तो सन्मान परत मिळत नाही कि ती वेळही पुन्हा येत नाही. अशा कैद्यांसाठी हिंगोरानी या कैवारी बनून आल्या होत्या.

हिंगोरानी यांनी अशा विचाराधीन कैद्यांच्या सुटकेसाठी १९७९ मध्ये पहिल्यांदाच न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यानंतर न्यायालयाने या याचिकेच्या आधारे तब्बल ४० हजार कैद्यांची सुटका केली होती. देशातील ही अशी पहिलीच ऐतिहासिक घटना होती. फस्टपोस्टने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

हिंगोरानी यांच्या याच कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांची प्रतिमा सर्वोच्च न्यायालयाच्या ग्रंथालयात लावण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ६७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला वकिलाची प्रतिमा लावण्यात येणार आहे. हिंगोरानी यांना जनहित याचिकांची जननी देखील म्हटले जाते. त्यांची प्रतिमा आता जगातील नावाजलेले वकिल अॅड. एम. सी. सेटलवाड, अॅड. सी. के. दफ्तरी आणि अॅड. आर. के. जैन यांच्या प्रतिमांसोबत लावण्यात येणार आहे. या प्रतिमेची माहिती देताना सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांनी सांगितले की, यापूर्वीच हे काम होणे अपेक्षित होते.

हिंगोरानी या देशाच्या अशा पहिल्या महिला वकील होत्या ज्यांनी इंग्लंडमधून कायद्याची पदवी घेऊन विचाराधीन कैद्यांच्या हितार्थ कायद्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न केले. दक्षिण अफिक्रेतील नैरोबी येथे जन्मलेल्या हिंगोरानी यांच्यावर महात्मा गांधींचा मोठा प्रभाव होता. त्यामुळेच पदवीनंतर त्यांनी भारतात राहणे आणि देशासाठी काम करण्याचा निर्णय घेतला होता. ६० वर्षांच्या कारकिर्दीत त्या आपल्या कुटुंबियांपासूनही दूर राहिल्या. हिंगोरानी यांचे ८६व्या वर्षी २०१३मध्ये निधन झाले.