उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि सहारणपूर दंगलीतील आरोपी व्यक्ती यांच्यातील संबंध उजेडात आणणारे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यामुळे शनिवारी अनेक चर्चांना उधाण आले . त्यानंतर अखिलेश आणि उत्तर प्रदेश सरकारविरुद्ध अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र, दंगलीतील आरोपींबरोबर अखिलेश यांचे वैयक्तिक संबंध असल्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे सांगत उत्तर प्रदेश सरकारकडून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
एका हिंदी वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर अखिलेश यादव यांचे सहारणपूर दंगलीतील आरोपी असणाऱ्या व्यक्तीबरोबरचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. एप्रिल महिन्यात काढण्यात आलेले हे छायाचित्र एका समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या सोशल अकाऊंटवरून घेण्यात आले होते. या छायाचित्रामुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेश सरकारच्या दंगल प्रकरणातील तपासाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, अशाप्रकारे एखाद्या छायाचित्रावरून कुणा एका व्यक्तीवर आरोप करणे हे भारतीय लोकशाहीच्या परंपरेसाठी शोभनीय नसल्याचे मत, सरकारच्या अधिकृत प्रवक्त्यांकडून व्यक्त करण्यात आले. तसेच सहारणपूर दंगलीतील दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यापूर्वी मुझफ्फरनगर दंगलीतील आरोपी मौलाना नझीर याची भेट घेतल्यामुळे अखिलेश यांच्याविरुद्ध टीकेचे वादळ उठले होते.