अहमदाबादवरून जयपूरला जाणाऱ्या गो एअरच्या विमानात अचानक एक कबुतर शिरल्यानं एकच खळबळ उडाली होती. या संपूर्ण प्रकाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. विमान उड्डाण घेण्यापूर्वी एक कबुतर आत दिसल्यानं गोंधळ उडाला होता. त्यानंतर विमान थांबवून त्या कबुतराला बाहेर सोडण्यात आलं.

अहमदाबाद एअरपोर्टवर गो एअरचे विमान जी ८-७०२ उड्डाण घेण्यापूर्वी त्यात कबुतर शिरलं. तसंच त्याचा विमानात मुक्तसंचार सुरू झाला. हे पाहून विमानातील प्रवाशांमध्ये आणि क्रू मेंबर्समध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झाला. दरम्यान, विमानातील काही प्रवशांनी याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

या घटनेमुळे विमान जयपूरला पोहोचण्यास विलंब झाला. अहमदाबादवरून जयपूरला जाणारे विमान गुरूवारी संध्याकाली ४.३० च्या सुमारास एप्रिनवर आणण्यात आलं. सर्व प्रवासी विमानात बसल्यानंतर विमानाचे दरवाजे बंद करण्यात आले. उड्डाणासाठी विमान धावपट्टीवर येत असताना एका प्रवाशानं सामान ठेवण्याच्या जागेवर आपली बॅग ठेवण्यासाठी शेल्फ उघडलं. त्यावेळी त्यातून एक कबुतर बाहेर पडलं. दरम्यान, विमानात कबुतर पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आणि एकच गोंधळ उडाला. क्रू मेंबर्सनं तातडीनं याची माहिती ग्राऊंड स्टाफला दिली. त्यानंतर विमानाचे दरवाजे उघडून त्या कबुतराला बाहेर सोडण्यात आलं. यादरम्यान, प्रवाशांनी आणि क्रू मेंबर्सनं कबुतराला पकडण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.