पिलाटस बेसिक ट्रेनर विमानांच्या खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी सीबीआयने वादग्रस्त शस्त्रास्त्र डीलर संजय भंडारी आणि अन्य अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. २००९ साली इंडियन एअर फोर्ससाठी ७५ पिलाटस एअरक्राफ्ट खरेदीचा स्विस कंपनी बरोबर २८९५ कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता.

सीबीआयने संजय भंडारीसह एअर फोर्स, संरक्षण मंत्रालय आणि पीलाटस एअरक्राफ्ट लिमिटेडच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. या डीलमध्ये ३३९ कोटी रुपयांची लाच देण्यात आल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. संजय भंडारी आणि अन्य आरोपींच्या दिल्लीतील मालमत्तांवर शुक्रवारी सीबीआयने छापे मारले. आणखी काही ठिकाणी छापे मारण्याची कारवाई होणार असल्याचे सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले.

सीबीआयने एफआयआरमध्ये संजय भंडारीच्या मालकीच्या ऑफसेट इंडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे नाव घेतले आहे. लंडनमध्ये रॉबर्ट वड्रा यांच्यासाठी बेनामी मालमत्ता विकत घेतल्या प्रकरणी संजय भंडारीची आधीच चौकशी सुरु आहे. भंडारीच्या ऑफसेट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडने पीलाटस एअरक्राफ्ट लिमिटेडला नेमकी कुठली सेवा दिली त्याचा तपास सीबीआयकडून सुरु आहे.

एअर फोर्समध्ये निवड होणाऱ्या वैमानिकांना बेसिक प्रशिक्षणार्थी विमानांमध्ये उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जाते. स्वदेशी बनावटीच्या एचटीपी-३२ विमांनाचा वापर शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर एअर फोर्सने पिलाटस पीसी-७ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला.