उत्तर प्रदेशमधील पिलभीत व्याघ्रप्रकल्पामधील देवरिया रेंजमध्ये वाघाने केलेल्या हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. मरण पावलेल्या दोघांसोबत प्रवास करणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीने जवळच्या झाडावर चढून स्वत:चा जीव वाचवला. ही तिसरी व्यक्ती रात्रभर झाडावर बसून असल्याची माहिती समोर आली आहे.

कंदाई पाल (२७), सोनू पाल (२२) आणि विकास (२३) हे तिघे पिलभीत येथील आपल्या गावी मोटरसायकलवरुन परत येत होते. शहाजहानपूरमधून पिलभीतला येणाऱ्यासाठी त्यांनी व्याघ्रप्रकल्पामधून देवरिया रेंजमधून जाणारा मार्ग निवडला. रात्री नऊच्या सुमारास त्यांनी व्याघ्रप्रकल्पाच्या परिसरामध्ये प्रवेश केला. या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी या ठिकाणी एका वाघिणीचा वावर असून या मार्गाने जाऊ नका असा सल्ला या तिघांना दिला. “त्या तिघांनी हा सल्ला ऐकून न ऐकल्यासारखा करत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. जंगलामधून जाणाऱ्या रस्त्यावरच वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. कंदाई आणि सोनू यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला तर विकासने जवळच्या झाडावर चढत स्वत:चा जीव वाचवला,” असं सर्कल ऑफिसर असणाऱ्या लल्लन सिंह यांनी सांगितलं.

सकाळी या ठिकाणी स्थानिकांना दोन मृतदेह दिसून आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. स्थानिकांनी तातडीने यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. कंदाई आणि सोनूच्या मानेवर, चेहऱ्यावर आणि छातीवर वाघाच्या पंजांचे निशाण होते असं स्थानिकांनी सांगितलं. स्थानिकांनी विकासला मदत करत झाडावरुन खाली उतरवलं. जवळच्या पोलीस स्थानकातील एक तुकडी तातडीने घटनास्थळी पोहचली आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेत ते शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी विकासलाही जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. “विकासला मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्याने आम्हाला या हल्ल्यासंदर्भात माहिती दिली आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत,” असं सर्कल ऑफिसरने स्पष्ट केलं.

हा हल्ला करणारा वाघ नक्की कोणता आहे याचा तपास वन अधिकारी करत आहेत. “काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एक वाघीण दिसून आली आहे. या वाघीणीनेच हा हल्ला केल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. आमची टीम या वाघीणीचा शोध घेत आहे. जवळच्या गावांमधील गावकऱ्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.” असं पिलभीतचे उप निर्देशक नवीन खंडेलवाल यांनी सांगितलं आहे.

पिलभीतमध्ये मागील काही वर्षभरात पहिल्यांदाच वाघाने अशाप्रकारचा हल्ला केल्याची घटना घडलीय. २०१७ पासून पिलभीतमध्ये वाघांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये २९ जणांचा मृत्यू झालाय.