कोणतीही विमान कंपनी ही कायम शिस्तप्रिय आणि वक्तशीरपणा या दोन मुद्द्यावर चांगली आणि वाईट ठरते. एखाद्या विमानकंपनीला त्यांच्या व्यवथापनातील चुकीमुळे अनेकदा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. मात्र एका विमानकंपनीला चक्क हवेत उडणाऱ्या एका पक्षामुळे सुमारे ५ कोटींचा फटका बसला आहे.

गो एअर या विमानकंपनीच्या बाबतीत एक विचित्र घटना घडली आहे. या विमानकंपनीला एका पक्ष्यामुळे तब्बल ५ कोटींचा आर्थिक फटका बसला. गुरुवारी ही घटना घडली. गो एअर कंपनीचे विमान कोलकाताहून पोर्ट ब्लेअरला निघाले होते. मात्र अर्ध्यातूनच हे विमान पुन्हा कोलकात्याला गेले. हे विमान हवेत असताना एक पक्षी विमानाच्या इंजिनाला धडकला. त्यामुळे हे विमान रद्द करण्यात आले.

G8-101 हे विमान १६० प्रवाशांना घेऊन सकाळी साडे आठला निघाले. मात्र त्यांनतर काही वेळाने वैमानिकाने विमान परत कोलकात्याकडे वळवत असल्याची माहिती दिली. उजव्या इंजिनात प्रचंड घर्षण जाणवत असल्याने त्याने हा निणर्य घेतला होता. इंजिनातील घर्षण हे धोकादायक मर्यादेच्या पलीकडे गेले होते. अशा परिस्थिती विमान हवेत असणे साऱ्यांचाच जीवाला धोक्याचे ठरले असते. त्यामुळे वैमानिकाने विमान परतीच्या वाटेने वळवले, मात्र त्याने याबाबत कंट्रोल रूममध्ये माहिती दिली नव्हती. अखेर कंट्रोल रूमने वैमानिकाशी संपर्क साधल्यानंतर ते विमान घर्षणामुळे परत येत असल्याचा उलगडा झाला.

पक्ष्याच्या धडकेमुळे इंजिनाच्या ६ बेल्डचे नुकसान झाले असून विमान तातडीने रद्द करण्यात आले असल्याची माहिती इंजिनिअरने दिली. त्यामुळे सर्व प्रवाशांचे तिकिटाचे पैसे परत करण्यात आले. या सर्व बाबींची एकूण रक्कम ही सुमारे ५ कोटी असल्याचे विमानकंपनीकडून सांगण्यात येत आहे.