दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सुरक्षा यंत्रणांची चांगलीच पळापळ झाली. धावपट्टीवर विमान उतरवताना लेझर किरणांमुळे आपले लक्ष विचलित झाल्याचा दावा इंडिगो एअरलाईन्सच्या पायलटने केला. त्याने ही माहिती हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (एटीसी) दिल्यानंतर घातपाताच्या शक्यतेने सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. मात्र, तपासात कोणतीही संशयास्पद बाब आढळून आली नाही. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगो एअरलाईन्सचे 6E198 हे विमान मुंबईहून दिल्लीला आले होते. मध्यरात्री १२.४० वाजता हे विमान २९\११ या धावपट्टीवर उतरणार होते. त्यावेळी विमानाचा पायलट शुभम त्रिवेदी याने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वी पाच नॉटिकल मैलांवर आकाशातील एका गोष्टीमुळे आपले लक्ष विचलित झाल्याचे होत असल्याचे सांगितले. त्यानंतर हवाई वाहतूक कक्षाने योग्य त्या सूचना देऊन पायलटला विमान धावपट्टीवर उतरवायला मदत केली. विमान धावपट्टीवर उतरेपर्यंत विमानतळावरील अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आली होती. त्यांनी याबाबत दिल्ली पोलिसांना कळवले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी तातडीने दिल्ली विमानतळावर धाव घेतली. यावेळी त्यांनी पायलटची भेट घेऊन त्याला संबंधित घटनेबद्दल विचारले. त्यावेळी विमातळानजीक असताना लेझर किरणांमुळे पायलटचे लक्ष विचलित झाल्याची माहिती पुढे आली. यामुळे विमान उतरवण्यातच अडथळा आला नाही, तर प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण होण्याची शक्यता होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांकडून यापूर्वीच विमानतळाच्या परिसरात लेझर किरणांवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.