इंडियन एअर फोर्सचे एएन-३२ मालवाहतूक विमान सोमवारी दुपारी बेपत्ता झाले. त्यावेळी या विमानाचे वैमानिक आशिष तन्वर (२२) यांची पत्नी नियंत्रण कक्षातच होती. तिने हा सर्व घटनाक्रम जवळून अनुभवला. एएन-३२ ने दुपारी १२.२५ च्या सुमारास आसामच्या जोरहट तळावरुन अरुणाचल प्रदेशमधील मीचुका येथे जाण्यासाठी उड्डाण केले. त्यावेळी आशिष तन्वर यांची पत्नी संध्या एअर फोर्सच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षात डयुटीवर होत्या.

दुपारी एकच्या सुमारास विमानाचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. त्यानंतर तासाभराने संध्याने आम्हाला फोन करुन काय घडलं आहे त्याची कल्पना दिली असे आशिषचे काका उदयवीर सिंह यांनी सांगितले. तन्वर कुटुंबिय मूळचे हरयाणाच्या पलवालचे आहे. एएन-३२ विमानाचा अजूनही शोध लागलेला नसून प्रत्येक तासागणिक कुटुंबाची चिंता वाढत चालली आहे.

सुरुवातीला आम्हाला विमान चीनच्या हद्दीत गेल्यानंतर तिथे त्यांनी इमर्जन्सी लँडिंग केले असावे असे वाटत होते. पण असे घडले असते तर आतापर्यंत त्यांनी संपर्क साधला असता असे उदयवीर सिंह यांनी सांगितले. अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आशिषचे वडिल आसामला गेले आहेत. त्याची आई घरीच आहे. या घटनेमुळे आई पूर्णपणे कोसळून गेली आहे असे उदयवीर म्हणाले.

तन्वर कुटुंबाला लष्करी सेवेची परंपरा आहे. घरातल्या या वातावरणामुळे आशिषवर लहानपणापासून सैन्यदलांचा प्रभाव होता. देशसेवा करण्याची त्याची तीव्र इच्छा होती. आशिषची मोठी बहिण आयएएफमध्ये स्क्वाड्रन लीडर आहे.