माकपचे ज्येष्ठ नेते पिनरायी विजयन यांनी बुधवारी केरळच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विजयन यांच्यासह १९ मंत्र्यांनी शपथ घेतली असून त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मंत्रिमंडळात १३ नवे चेहरे आहेत.
केरळचे राज्यपाल न्या. (निवृत्त) पी. सदाशिवम यांनी विजयन यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजयन यांनी मल्याळी भाषेतून शपथ घेतली. विजयन के माकपच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य असून ते केरळचे १२ वे मुख्यमंत्री आहेत.
मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह १२ जण माकपचे, चार जण भाकपचे तर एनसीपी, जनता दल (एस) आणि काँग्रेस (एस)चा प्रत्येकी एक सदस्य आहे. यापूर्वीच्या यूडीएफ मंत्रिमंडळात २१ सदस्य होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत केरळमध्ये माकपने वर्चस्व गाजविताना सत्ता काबिज केली आहे. बंगामध्ये पक्ष पराभूत झाला.