आता गाडी येईल, मग येईल असा विचार करत बराच वेळ प्लॅटफॉर्मवर घालवावा लागणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेमत्री पीयूष गोयल यांनी एक चांगली बातमी दिली आहे. १ जुलै रोजी भारतातील सर्व रेल्वे १०० टक्के वेळापत्रकानुसार धावल्या. पण ही बातमी गोड मानून घ्यायला ना सर्वसामान्य प्रवासी रेल्वे स्टेशन्सवर होते, ना तेवढ्या रेल्वे सध्या धावताहेत. लॉकडाउनमुळे रेल्वे सेवेला फटका बसलेला असतानाच खुद्द रेल्वेमंत्र्यांनीच हा दावा केल्याने रेल्वेच्या या ऐतिहासिक कामगिरीचा टि्वटरकरांनी चांगलाच समाचार घेतल्याचे चित्र ट्विटरवर पहायला मिळत आहे.

रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी भारतीय रेल्वेने इतिहास रचल्याची माहिती दिली आहे. १ जुलै रोजी भारतातील सर्वच्या सर्व म्हणजेच १०० टक्के रेल्वेच्या गाड्या नियोजित वेळेत धावल्याचा दावा गोयल यांनी केला आहे. ट्विटरवरुन त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली असून ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे नमूद केलं आहे. मात्र त्यांच्या या दाव्यावरुन नेटकऱ्यांनी एकीकडे लॉकडाउनमुळे रेल्वे सेवा सर्वाधिक प्रभावित झालेली असतानाच दुसरीकडे रेल्वे मंत्र्यांनी अशापद्धतीने स्वत:चीच पाठ थोपटून घेणं कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये २४ मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यापासून प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देशातील वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये पोहचवण्यासाठी श्रमिक विशेष ट्रेन्सची सेवा सुरु करण्यात आली. त्यानंतर दीड महिन्यांनी म्हणजेच  १५ जूनपासून मुंबईमध्ये मध्य व पश्चिम रेल्वेवर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आल्या. पोलीस, पालिका, खासगी व शासकीय रुग्णालय कर्मचारी, मंत्रालय याच कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी परवानगी देण्यात आली. मात्र असं असलं तरी नेहमीच्या तुलनेत सध्या भारतामध्ये २५ टक्क्यांहून कमी रेल्वे गाड्या धावत आहेत.


अनलॉक १ नंतर जुलैपासून अनेक राज्यांमध्ये अनलॉक २ ची घोषणा झाली असली तरी रेल्वे मंत्रालयाने प्रवासी वाहतूक मोजक्या प्रमाणत सुरु ठेवली आहे. त्यामुळे आधीच रेल्वे कमी संख्येने धावत असतानाच रेल्वे मंत्र्यांनी वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्या धावण्याचा प्रमाण १०० टक्के असल्याचे सांगणे हा आपलेच कौतुक करण्याचा केविलवाणा प्रकार असल्याचं अनेकांनी गोयल यांच्या ट्विटखाली म्हटलं आहे. करोना लॉकडाउमुळे वेळापत्रक कोलमडून पडलेलं असता रेल्वे वेळेत धावल्या हा दावा हस्यास्पद असल्याचे काहींनी म्हटलं आहे.

ही पण माहिती द्या

आपलाच विक्रम

२० टक्के ट्रेन्सही ऑन ट्रॅक नाहीत

२०० ट्रेन धावल्या आणि

आता नाही तर कधी?

हे म्हणजे मी पहिला आलो पण…

एकंदरितच गोयल यांच्या ट्विटवरील प्रतिक्रिया पाहता या ऐतिहासिक लॉकडाउनमध्ये रेल्वे १०० टक्के वेळेत धावल्याचा रेल्वे मंत्र्यांनी केलेला दावा सर्वसामान्यांनी हसत हसतच स्वीकारल्याचे चित्र दिसत आहे.