अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे प्रदीर्घ आजाराने १० मे रोजी निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून त्याला ‘ग्लायोब्लास्टोमा’शी (ब्रेन कॅन्सर) ग्रासले होते. २२ फेब्रुवारी २०१९ रोजी ब्रेन कॅन्सरच्या ऑपरेशनसाठी तो अमेरिकेतील लॉस अँजेलिसला गेला होता. तेव्हापासून तो उपचार घेत होता. रविवारी सकाळी ७:३० वाजता (भारतीय प्रमाण वेळ) त्याची प्राणज्योत मालवली.

साईप्रसाद गुंडेवारने आजवर अनेक मालिका, बॉलिवूड चित्रपटांसह हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्याने एमटीव्हीवरील ‘स्प्लिट्सविला पर्व ४’ (Splitsvilla Season 4), स्टार प्लस वाहिनीवरील ‘सर्वाइवर’ (Survivor), तसेच अमेरिकेतील लोकप्रिय S.W.A.T., Cagney and Lacey, The Orville, The Mars Conspiracies,’द कार्ड’ (The Card) या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘रॉक ऑन’, ‘पप्पू कान्ट डान्स साला’, ‘लव्ह ब्रेकअप जिंदगी’, ‘डेव्हिड’, ‘आय मी और मैं’, ‘पीके’, ‘बाजार’ इत्यादी हिंदी चित्रपटांसोबतच काही हॉलिवूडपट व लघुपटांमध्ये विविध भूमिका केल्या. डॉ. मीना नेरुरकर यांच्या ‘ए डॉट कॉम मॉम’ या एकमेव मराठी चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका केली आहे.

साईने २०१५ मध्ये फॅशन डिझायनर सपना अमीनशी लग्न केले होते. त्याच्या पश्चात पत्नी सपना, आई शुभांगी, राजश्री, वडील राजीव असा परिवार आहे. अतिशय तरुण वयात त्याने जगाचा निरोप घेतल्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.