चीनच्या बोलण्यात आणि करण्यात खूप फरक असतो, हे वारंवार सिद्ध झालंय. पुन्हा एकदा हे दिसून आलं आहे. पूर्व लडाखमध्ये संघर्ष निर्माण झालेल्या ठिकाणांहून दोन्ही देशाच्या सैन्यांनी माघार घ्यावी, नुकतीच अशी अपेक्षा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली होती. पण प्रत्यक्षात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीची कृती बिलकुल याउलट आहे. ग्राऊंड लेव्हलवर PLA ने मागे हटण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

पँगाँग टीएसओमध्ये फिंगर फोरजवळ चीन उलट सैन्य तैनाती आणखी मजबूत करत आहे. पँगाँग सरोवरच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर फोर येथे चीनने आपली पकड मजबूत करण्यासाठी सैनिक संख्या दुप्पट केली आहे. त्यामुळे चीनच्या हेतूबद्दलच शंका आहे. पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्यावर भारतही मजबूत स्थितीमध्ये आहे. तिथल्या टेकडया भारतीय सैन्याने ताब्यात घेतल्या आहेत.

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर आज मॉस्कोमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांची भेट घेणार आहेत. सीमेवर असलेली युद्धजन्य स्थिती लक्षात घेता, ही भेट खूप महत्त्वाची आहे. १९९३ साली दोन्ही देशांमध्ये सीमेवर शांतता ठेवण्यासाठी करार झाला होता. त्याची आठवण जयशंकर आज चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना करुन देतील.

ताबारेषेवर स्फोटक स्थिती
पूर्व लडाखमध्ये चीनच्या कुरापती सुरूच आहेत. रेझांग-ला येथील मुखपरीजवळ भाले, लोखंडी शिगा आणि अन्य शस्त्रे हाती घेतलेल्या चिनी सैन्याने सोमवारी भारतीय जवानांना चिथावणी दिली. चीनने प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ गोळीबारही केला. भारताचा भूभाग बळकावण्याचा चीनचा प्रयत्न भारतीय जवानांनी पुन्हा हाणून पाडला असून, चीनच्या खुमखुमीमुळे प्रत्यक्ष ताबारेषेवरील स्थिती स्फोटक बनली आहे.

पूर्व लडाखमध्ये सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ५० ते ६० सशस्त्र चिनी सैनिक प्रत्यक्ष ताबारेषेजवळ भारतीय लष्कराच्या चौक्यांच्या जवळ आले होते. त्यांनी भारतीय जवानांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्याने माघार घेतली. मात्र, माघारी फिरताना चिनी सैन्याने गोळीबाराच्या १० ते १५ फैरी हवेत झाडल्या, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.