प्रवास करताना एखादी बॅग किंवा पिशवी बसमध्ये अथवा रेल्वेत विसरणे सामान्य गोष्ट आहे. अनेकदा अशा गोष्टी शेवटच्या स्थानकावर ती गोष्ट संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्या जातात. विमानप्रवासातही एखादी छोटी बॅग किंवा हॅण्डबॅगसारख्या वस्तू विसरणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण बरेच आहे. मात्र सौदी अरेबियामधील एक महिला प्रवासी चक्क आपल्या बाळालाच विमानतळावर विसरली. विमानाने हवेत उड्डाण घेतल्यानंतर ही गोष्ट तिच्या लक्षात आल्यानंतर विमानाचे इमर्जन्सी लॅण्डींग करण्यात आले.

वाचायला थोडं विचित्र वाटेल पण खरोखर ही घटना सौदी अरेबियामधील जेद येथील किंग अब्दुलझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली आहे. आपल्या लहान बाळाला विमानतळावच विसरुन ही प्रवासी माहिला विमानात चढली. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अचानक तिला आपल्या बाळाची आठवण झाली त्यावेळी सर्व प्रकार उघडकीस आला. आपण आपल्या बाळाला डिपार्चरमधील वेटींग रुममध्येच विसरल्याचे लक्षात येईपर्यंत विमान हवेत झेपावले होते. घाबरलेल्या या महिलेने घडलेला हा प्रकार विमानातील क्रू मेंबर्सला सांगितल्यानंतर विमान पुन्हा जमीनीवर उतरवण्यात आल्याचे वृत्त गल्फ न्यूज या वेबसाईटने दिले आहे. जेद येथून क्वाललंपूरला जाणाऱ्या एसव्ही 832 विमानामध्ये हा प्रकार घडला आहे. हा प्रकार या महिलेने सांगितल्यानंतर वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षासी संपर्क साधून विमानाच्या इमर्जन्सी लॅण्डींगासाठी परवाणगी मागितली. या वैमानिकाने केलेल्या या मागणीच्या रेकॉर्डींगचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. ‘आमच्या विमानाला परत विमानतळावर उतरण्याची परवाणगी द्यावी. एक महिला प्रवासी वेटींग एरियामध्ये आपलं लहान बाळ विसरली आहे,’ असं वैमानिक नियंत्रण कक्षाला सांगतानाचा हा व्हिडीओ आहे.

हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला वैमानिकाने इमर्जन्सीची माहिती दिल्यानंतर तेथील अधिकारीही गोंधळात पडले. अशा प्रसंगी विमान उतरवण्याची परवाणगी देण्यासंदर्भातील नियमांवर काही मिनिटे चर्चा झाल्यानंतर विमान उतरवण्यास परवाणगी देण्यात आली. ‘ठिकं आहे. तुम्ही विमान उतरवू शकता. अशा कारणासाठी विमान उतरवण्याची परवाणगी देणं आमच्यासाठी अगदीच नवं आहे,’ असं नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी या वैमानिकाला सांगितले.

विमान उतरवण्यात आल्यानंतर या आईला तिचे बाळ वेटींग रुममध्ये सुखरुप सापडल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला.