करोना विषाणूने चीनमध्ये शंभरहून अधिक बळी घेतले असतानाच वुहान येथे काही भारतीय लोकही अडकून पडले आहेत त्यात बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना तेथून परत आणण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे असे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी सांगितले. दरम्यान  भारतात अजून करोना विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही असे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे.

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची औष्णिक तपासणी सात विमानतळावर केली जात होती. आता वीस विमानतळावर ही तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यात विषाणूच्या संसर्गाचा अंदाज घेतला जातो. पुण्यातील एनआयव्हीशिवाय आणखी चार विषाणू तपासणी प्रयोगशाळा नमुने तपासण्यासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. चीनमधील अनेक प्रांतात हा विषाणू पसरला असून विविध राज्यांतील भारतीय विद्यार्थी वुहान येथे अडकून पडले आहेत. त्यात गुजरातच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी वडोदरा विमानतळावर वार्ताहरांना सांगितले की, भारतीय दूतावास चीन सरकारच्या संपर्कात असून वुहानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी विमान पाठवण्यात येणार आहे. त्यांना परत आणण्यासाठी काही दिवस लागतील पण लोकांनी यात सरकारवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आतापर्यंत एकाही भारतीय विद्यार्थ्यांला या विषाणूची लागण झालेली नसून पालकांनी काळजी करण्याचे कारण नाही.  एकूण अडीचशे  विद्यार्थी हुबेई प्रांतातील वुहान येथे अडकून पडले असून त्यांना परत आणल्यानंतर १४ दिवस वेगळे ठेवावे लागणार आहे.

दरम्यान आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, २०१४ मध्ये इबोलाबाबत सरकारने दक्षता बाळगली होती त्याला भारतात प्रवेश करू दिला नव्हता तसेच प्रयत्न आता आम्ही करीत आहोत, नवीन करोना विषाणूचा शिरकाव भारतात होऊ नये यासाठी सर्व ती काळजी घेतली जात आहे. सध्या देशात पुण्यातील एनआयव्हीशिवाय इतर चार प्रयोगशाळा रुग्णांचे नमुने तपासण्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. येत्या काही दिवसात १० प्रयोगशाळा उपलब्ध केल्या जातील. ज्या विमानतळांवर औष्णिक तपासणी सुविधा आहे अशा विमानतळांची संख्या वाढली आहे. नेपाळ सीमेवर विशेष लक्ष ठेवले जात असून तेथे या रोगाचा एक रुग्ण निश्चित झाला आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.