“सरकार जगातील सर्वात लांब महामार्ग म्हणजेच दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवे बांधत आहे”, असं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री यांनी जाहीर केलं आहे. शुक्रवारी (१७ सप्टेंबर) एका कार्यक्रमात ते बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले की, “एक्स्प्रेस वे १ हजार ३८० किमी लांबीचा असेल आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) पर्यंत जाईल. परंतु, आता आम्ही तो नरिमन पॉईंटपर्यंत नेण्याचा देखील विचार करत आहोत.” आणखी महत्त्वाचं म्हणजे गडकरी यांच्या मते, हा प्रकल्प मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होईल. म्हणेजच, भारतात २०२२ पर्यंत जगातील सर्वात मोठा एक्सप्रेस वे असेल.

आतापर्यंत मुंबई ते दिल्ली दरम्यानचं अंतर कापण्यासाठी ट्रकने सुमारे ४८ तास आणि कारने २४ ते २६ तास लागत आहेत. पण, येत्या वर्षभरात दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवे पूर्ण झाल्यानंतर प्रवासासाठी लागणार हा वेळ चांगलाच कमी होणार आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवे झाल्यानंतर दिल्ली आणि मुंबईमधील हे अंतर कापण्यासाठी एखाद्या ट्रकला अंदाजे १८ ते २० तास आणि कारला १२ ते १३ तास लागतील, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.

Nitin Gadkari in Action Mode: जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस-वेची पाहणी करण्यासाठी थेट हेलिकॉप्टरने पोहचले

सध्या दिल्ली ते मुंबई अशा प्रवासासाठी १४५० किमी अंतर कापावं लागतं पण एक्सप्रेस-वे झाल्यानंतर हे अंतर १२५० किमी होणार आहे. त्यामुळे सध्या २४ तासांचा वेळ लागणारा हा प्रवास एक्सप्रेस वेमुळे १२ तासांवर येईल असं सांगितलं आहे.

गडकरी म्हणाले की, “हा महामार्ग राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या आदिवासी जिल्ह्यांमधून जात आहे. त्यामुळे, या भागांचा विकास होईल. त्याचसोबत, येथील लोकांसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील.” काहीच दिवसांपूर्वी नितीन डकरी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत जाऊन दिल्ली मुंबई एक्सप्रेस-वेच्या कामाची पहाणीसुद्धा केली आहे. यावेळी, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेसंदर्भात बोलताना गडकरींनी म्हटलं की, “संपूर्ण देशासाठी हे अभिमानास्पद आहे.”