जयपूर : येथील सवाई मानसिंग वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात रक्तद्रव उपचार पद्धती सुरू करण्यात आली असून गंभीर रुग्णांमध्ये त्याचा वापर करण्यात येत आहे. त्यातून आश्वासक असे निष्कर्ष मिळत असल्याचे वरिष्ठ डॉक्टरांनी म्हटले आहे.

तीन रुग्णांवर उपचार यशस्वी झाले असून आणखी दोन जणांवर रक्तद्रव उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती या वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर भंडारी यांनी दिली. कोविड १९ रुग्णांना रक्तद्रव उपचार देणाऱ्या पथकाचे डॉ. भंडारी हे प्रमुख असून तीन रुग्णांवर हे उपचार यशस्वी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तीनही रुग्णात चांगले परिणाम दिसून आले असून त्यांच्यात ऑक्सिजन संपृक्तता व डी-डायमर हे घटक योग्य दिसून आले आहेत. यात डी-डायमर ही रक्ताची चाचणी असते त्यात रक्तात गुठळ्या नाहीत याची निश्चिती केली जाते. भंडारी यांनी म्हटल्यानुसार रक्तद्रव पद्धती ही भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने घालून दिलेल्या निकषांनुसार पार पाडण्यात आली. यात रुग्णाला बऱ्या झालेल्या कोविड १९ रुग्णाचा रक्तद्रव दिला जातो. बऱ्या झालेल्या रुग्णात करोना विषाणूविरोधी प्रतिपिंड तयार झालेले असतात. रुग्णाला लागोपाठ दोन दिवस २०० मि.ली रक्तद्रव दिला जातो. भंडारी यांनी म्हटले आहे की, रक्तद्रव दाते हे करोनातून बरे होऊन २१ ते २८ दिवस पूर्ण केलेले रुग्ण असतात. बऱ्या झालेल्या  व्यक्तींच्या चाचण्या नकारात्मक आल्यानंतरच पुरेसे प्रतिपिंड असल्यास रक्तद्रव घेतला जातो. यात प्रतिपिंड चाचणी करून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या रक्तद्रवात पुरेसे प्रतिपिंड आहेत हे तपासले  जाते.

यापूर्वी काही रुग्णांत  हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, लोपिनवीर ४०० मि.ग्रॅ, रिटोनाविर १०० मि.ग्रॅ यांचा वापर करण्यात आला होता.   रेबीज, हेपॅटिटीस बी, पोलिओ, गोवर, इन्फ्लुएंझा, इबोला या रोगांत रक्तद्रव वापरण्यात आला होता.

त्रिपुरात पुन्हा करोनाचा उद्रेक

आगरतळा : त्रिपुरात २ मेपासून पुन्हा एकदा करोनाचा उद्रेक झाला असून  एकूण १३० नवीन रुग्ण सापडले आहेत. मुख्यमंत्री बिप्लब कुमार  देब यांनी अलीकडेच हे राज्य करोनामुक्त झाल्याचे जाहीर केले होते. सर्व नवीन रुग्ण हे सीमा सुरक्षा दलाच्या ढलाई जिल्ह्य़ातील दोन बटालियनमधील आहेत. पहिल्या दोन रुग्णात गोमती जिल्ह्य़ातील एक महिला व उत्तर त्रिपुरातील टीएसआर जवान यांचा समावेश होता. ते एप्रिलमध्येच बरे झाले होते.